कापूस उत्पादनवाढीचे संशोधन आणि समाजकार्याचे जाळे विणणारे डॉ. श्रीरंग तथा दादा लाड यांचा कार्यपरिचय...
संघ प्रचारक ते पद्मश्री हा ज्येष्ठ कृषी संशोधक डॉ. श्रीरंग लाड यांचा जीवनप्रवास सर्वार्थाने थक्क करणारा आहे. त्यांनी विकसित केलेल्या कृषी तंत्रज्ञानामुळे कापसाच्या एकरी उत्पादनात मोठी वाढ झाली असून, शेतकर्यांचे उत्पन्नही वाढले आहे. केवळ शेतीच नव्हे, तर त्यांनी लाल कंधारी या देशी गायींच्या संवर्धनासाठीही मोठे काम केले. भारतीय किसान संघाचे क्षेत्रीय प्रचारक, अखिल भारतीय किसान संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असलेले दादा म्हणजे एक चालतेबोलते विद्यापीठच! अलीकडेच जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्कारानिमित्ताने त्यांचा कार्यपरिचय करून देणारा हा लेख...
दादांचे संपूर्ण नाव डॉ. श्रीरंग देवबा लाड. त्यांचा जन्म १९४८ साली माळसोभा या परभणी जिल्ह्यातील एका गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावी आणि नंतर पदवीपर्यंतचे शिक्षण परभणी येथे झाले. शिक्षण झाल्याबरोबर १९७०मध्ये दादा संघाचे प्रचारक झाले. या काळातच दादांनी हजारो कुटुंबे मातेच्या मायेने जोडली. या काळात दादांनी परभणी, तसेच आताच्या संभाजीनगर जिल्ह्यात संघप्रचारक म्हणून काम केले. पुढे १९८३ साली दादांकडे भारतीय किसान संघाच्या मराठवाडा संघटनमंत्रिपदाची जबाबदारी आली. श्री. लाड अर्थात दादा प्रचारक असताना घरे जोडणारे होते. दादा भारतीय किसान संघाचे क्षेत्रीय प्रचारक, अखिल भारतीय किसान संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. हे सगळे करत असताना दादांनी शेतीतील संशोधन केले ते कापूस या नगदी पिकावर.
दादांनी कापसावर संशोधन करून त्याच्या उत्पन्नात आमूलाग्र बदल घडवून आणला. कापसाचे तीन-चार क्विंटल उत्पन्न त्यांनी एकरी ३२ क्विंटलपर्यंत नेले. म्हणजे, थोडेथोडके नाही, तर तब्बल आठपट वाढ करून दाखवली. हे काही सहजासहजी झाले नाही. दादा यासाठी २००१पासून प्रयत्न करीत होते. तब्बल २५ वर्षांनंतर दादांना हे यश मिळाले आणि याची दखल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ११ डिसेंबर २०२५ रोजी दादांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केली. शिवाय, भारत सरकारने पद्मश्री सन्मान जाहीर केला. श्री. गोळवलकर गुरुजी पुरस्कारही मिळाला.
कापसाचे उत्पन्न कसे वाढवावे, तर झाडांची उंची फार वाढवायची नाही. कापसाचे झाड कमरेएवढे झाले, की त्याचा शेंडा खुडायचा आणि झाडाला ज्या दोन किंवा तीन गळफांद्या असतात, त्या ३५व्या दिवशी काढून टाकायच्या, जेणेकरून झाडाची कायिक वाढ म्हणजे अवास्तव वाढ होऊ द्यायची नाही. हे तंत्रज्ञान वापरून दादांनी प्रचंड प्रमाणावर कापसाचे उत्पन्न वाढवण्याची किमया केली आहे. कापूस उत्पादक शेतकर्यांच्या उत्पन्नात त्यामुळे लाखो रुपयांची वाढ झाली. त्यांनी अत्यंत चिकाटीने हे संशोधन केले. सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचलेले विद्यापीठ, शेतकर्यांना आर्थिक अधार देणारे विद्यापीठ, कापसाच्या उत्पादनात क्रांती घडवून आणणारे विद्यापीठ म्हणजेच डॉ. श्रीरंग देवबा लाड तथा दादा लाड होय.
दादांच्या प्रचारकीय व्यवस्थेतून अनेक कार्यकर्ते घडले. भारतीय किसान संघाच्या कामाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आणि दादांच्या रूपाने कार्यकर्त्यांना व भारतीय किसान संघाला न्याय मिळाला. अशा प्रकारे शेतीतील संशोधन आणि सामाजिक जाणिवेतून संस्थांमार्फत केलेले काम यांमुळे श्री. लाड यांना पद्मश्री सन्मान प्राप्त झाला आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment