संथाली भाषा, लोकसंगीत आणि ओल चिकी लिपीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अवलिया व्यक्तिमत्त्वाची ओळख...
माणूस जसजसा उत्क्रांत होत गेला तसतशी भाषा अस्तित्वात आली. इतके दिवस मूकपणे संवाद साधणारा माणूस आता शब्दांनी व्यक्त होऊ लागला. पुढे अनेक भाषा विकसित झाल्या. स्थानिक भाषा अस्तित्वात आल्या. दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यावर एकमेकांच्या भाषा समजू लागल्या. औद्योगिक क्रांतीनंतर तर जग म्हणजे जणू काही एक छोटे शहर बनले. आर्थिक प्रगती होत असताना मात्र काही भाषांचे महत्व वाढू लागले. स्थानिक भाषा लोप पावू लागल्या. आता मात्र पुन्हा एकदा या स्थानिक भाषा पुनरुज्जीवित होत आहेत. भाषा संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे चरण हेम्ब्रम. त्यांना यंदा पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यांचा हा अल्प परिचय...
९ फेब्रुवारी १९५२ रोजी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्याच्या रायरंगपूर परिसरातील जुन्या घाटी येथील नुआगाव गावात जन्मलेले चरण हेम्ब्रम शिक्षक आहेत. संथाली समुदायाशी संबंधित असल्याने, त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड निर्माण झाली. १९७१मध्ये मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक होण्याकरिता आवश्यक प्रशिक्षण घेतले आणि नंतर शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. शिक्षक झाल्यानंतर त्यांनी संथाली भाषेच्या प्रचारासाठी काम करण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर, ते आदिवासी सामाजिक-शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनेशी (ASECA) जोडले गेले. तिथे त्यांनी सरचिटणीस म्हणून काम केले आणि आदिवासी भाषा व संस्कृतीच्या विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
चरण हेम्ब्रम यांनी शाळा आणि संस्थांमध्ये ओल चिकी लिपीचे धडे दिले आणि तिचा प्रसार करण्यासाठी नियमित लेखन दौरे केले. त्यांनी आदिवासी संस्कृतीच्या विकासासाठी एक संघटनादेखील स्थापन केली आणि अनेक संथाली आखाडे आणि यात्रांचे संस्थापक व संचालक म्हणून काम केले. चरण यांनी ओल चिकी लिपीच्या विकासासाठी अनेक पुस्तके आणि जर्नल्स लिहिली आहेत. त्यांना संगीतातही रस आहे आणि विविध संथाली अल्बमद्वारे त्यांनी संथाली आदिवासी संगीतकार म्हणूनही ओळख मिळवली. त्यांनी कटकच्या आकाशवाणी केंद्रावरही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि संथाली भाषा रथ कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले. भाषेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी प्रवास केला.
त्यांना नाटक आणि खेळांमध्येही रस आहे. त्यांनी आदिवासी महिलांना खेळात प्रोत्साहन देण्यासाठी एक फुटबॉल संघ तयार केला आणि एक नाट्यमंडपही उभारला. केंद्रीय साहित्य अकादमीने नृत्य, संगीत आणि साहित्य या विषयांवर आयोजित केलेल्या अनेक चर्चासत्रांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतला. या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट आदिवासी नाट्य दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट आदिवासी नृत्य दिग्दर्शक अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना या वर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भाषा ही मनुष्याच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाची आहे आणि हेच मोठे कार्य चरण हेम्ब्रम यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याला वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment