व. पु. काळे - अमृत महाराष्ट्र

व. पु. काळे

'वपु' या दोन अक्षरांनी मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या वाचकप्रिय लेखकाच्या जन्मदिनानिमित्त (२५ मार्च) अल्प परिचय...

व. पु. काळे मुख्य फोटो
मुख्य फोटो

व. पु. म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच यांचा जन्म २५ मार्च १९३२ रोजी झाला. व. पु. काळे हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. हसता हसता डोळ्यांत पाणी आणणारा असा त्यांचा विनोद असे. विशेषत: तरुणाईच्या मनावर वपुंनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून गारूड केले होते. वपु मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते; पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आपल्या मातृभाषेत लिहिली याला तोड नाही. वपुंचे मराठी लेखन सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे, समृद्ध करणारे आहे. 

आपण सारे, अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार असे पत्रसंग्रह आणि ललित साहित्य खूपच प्रसिद्ध आहे. तसेच तप्तपदी, ठिकरी व वाट एकटीची यांसारख्या त्यांच्या कादंबर्‍याही खूपच गाजल्या. आपल्या लेखनातून जगण्याचे तत्त्वज्ञान सोप्या, पण रंजक पद्धतीने सांगणारे ते थोर साहित्यिक होते. व. पु. काळे यांचा वाचकविश्वात स्वतंत्र असा संप्रदाय आहे. वपुंनी ६०हून अधिक पुस्तकांचे लेखन केले. त्यातील पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची यांचे कथाकथन त्यांनी स्वतः केले. या कथाकथनाला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली आणि ऑडिओ कॅसेटमधून घराघरात पोहोचलेले वपु हे पहिले लेखक ठरले. पेशाने आर्किटेक्ट असलेले वपु इमारतींच्या आराखड्याचे रेखन करण्यापेक्षा शब्दलेखन करण्यात जास्त रमू लागले. मराठी साहित्याला एक थोर साहित्यिक लाभला. 

वपुंचे लेखन चौफेर होते. कथा, ललित, नाटक, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व लेखनप्रकार त्यांनी हाताळले. लेखनातील विशेष बाब म्हणजे कथा संपताना कथेत अचानक येणारा ट्विस्ट. त्यांच्या कथा जिवंत माणसांच्या, नातेसंबंधांच्या, स्वैर वेड्या मनाचे विविध कंगोरे अधोरेखित करणार्‍या असत. वपुंची कथा वाचताना डोळ्यासमोर कथेचे कथानक तरळते. लेखकाला कथा आपली वाटावी असेच वपु लिहीत असत. त्यांच्या लेखनातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे साधेपणा आणि सहजता. ते फार मोठे तत्त्वज्ञान सांगत नाहीत; पण साध्या भाषेत माणसाला जीवनाचे खरे अर्थ सांगून जातात. त्यांच्या कथांमधूनच आपल्याला उमजते, की आयुष्याचे खरे सौंदर्य हे छोटे छोटे क्षण जगण्यात आणि छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व ओळखण्यात आहे. 

एका चहाच्या कपातील आनंद, मित्रासोबतची गप्पा किंवा एखाद्या निवांत क्षणातील शांतता यांसारख्या साध्या गोष्टींमध्येही मोठा अर्थ दडलेला असतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचे लेखन वाचताना वाचकाला कधीही भार वाटत नाही, उलट एक मित्र सोबत बसून गप्पा मारत असल्याचा अनुभव येतो. वपुंच्या पार्टनर, झोपाळा, आपण सारे अर्जुन, ऐक सखे, चतुर्भुज, काही खरं काही खोटं अशा अनेक पुस्तकांवर, त्यांच्या कादंबर्‍या आणि कथांवर वाचकप्रियतेची मोहोर उमटली आहे. पार्टनर हे त्यांचे पुस्तक भरपूर लोकप्रिय आहे. त्यांच्या सर्व लेखनाचे, कथाकथनाचे श्रेय त्यांनी त्यांच्या पुण्याच्या चिंचोरे गुरुजींना दिले होते. व. पु. काळेंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, पु. भा. भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अशा या थोर लेखकाचे २६ जून २००१ रोजी निधन झाले.

(संकलित)


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 25-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 25-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement