महिलांच्या सक्षमीकरणात अमृत संस्था निभावतेय महत्त्वाची भूमिका - अमृत महाराष्ट्र

महिलांच्या सक्षमीकरणात अमृत संस्था निभावतेय महत्त्वाची भूमिका

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रम

महिलांच्या सक्षमीकरणात अमृत संस्था निभावतेय महत्त्वाची भूमिका मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोणतेही राज्य असो अथवा देश, सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून समाजाच्या प्रगतीला गती देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आज महिलांच्या सक्षमीकरणाचे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.

ग्रामीण व शहरी भागातील लक्ष्यित गटासाठी अमृत संस्था विविध उपक्रम राबवत आहे. त्यात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचाही समावेश आहे. फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, संगणक शिक्षण, अन्नप्रक्रिया, तसेच उद्योजकता विकास यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण महिलांनाही दिले जाते. या प्रशिक्षणामुळे महिलांना केवळ रोजगार मिळत नाही, तर त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम होतात.

अमृत संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे प्रशिक्षणानंतरही महिलांना सतत मार्गदर्शन केले जाते. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले बँक कर्ज, शासनाच्या विविध योजना, तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात संस्थेचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष फायदा महिलांच्या आणि एकंदरीतच लक्ष्यित गटातील उमेदवारांच्या जीवनात दिसून येतो.

धुळे जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये अमृत संस्थेच्या माध्यमातून हजारो महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारला आहे. शिवणकाम, ब्युटी पार्लर, बेकरी, हस्तकला अशा विविध व्यवसायांमध्ये महिलांनी आपली ओळख निर्माण केली आहे. काही महिलांनी तर इतरांना रोजगार देऊन उद्योजकतेचा आदर्श घालून दिला आहे.

अमृत संस्थेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे. त्यांचे कर्तृत्व केवळ घरापुरते मर्यादित न राहता समाजातील विविध कामकाजात त्या सक्रिय सहभाग घेत आहेत. महिलांच्या या बदलत्या भूमिकेमुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांना आत्मनिर्भर बनवणे ही काळाची गरज आहे. अशा वेळी अमृत संस्थेचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. शासनाच्या पाठबळासह समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला साथ दिल्यास महिलांच्या सक्षमीकरणाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे जाईल.

'अमृत' ही केवळ संस्था नसून, महिलांच्या, तसेच एकंदरीतच लक्ष्यित गटातील उमेदवारांच्या स्वप्नांना नवे पंख देणारी एक प्रेरणादायी चळवळ आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 21-03-2026 News publication date | Time: 12:31 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 21-03-2026 News publication date | Time: 12:31 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement