श्रीरामरक्षा स्तोत्राचे वेगळेपण आणि महत्त्व - अमृत महाराष्ट्र

श्रीरामरक्षा स्तोत्राचे वेगळेपण आणि महत्त्व

श्रीरामनवमीच्या निमित्ताने विशेष लेख...

श्रीरामरक्षा स्तोत्राचे वेगळेपण आणि महत्त्व मुख्य फोटो
मुख्य फोटो

चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच श्रीरामनवमी. श्रीराम हे फक्त आपले दैवतच नाही, तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. श्रीरामाचे चरित्र सर्वांनाच माहिती आहे. प्रभू श्रीरामांचे सामर्थ्य ज्यातून कळते असे स्तोत्र म्हणजे रामरक्षा. बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या या रामरक्षेची कथा आणि त्याच्या पठणाने काय होते, याबद्दल माहिती जाणून घेऊ या.

रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते, की एकदा माता पार्वतीने शंकरांना विचारले, की 'विष्णुसहस्रनामावली आहे, त्याप्रमाणे रामाचे एखादे स्तोत्र नाही का?' तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले; पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी, की आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने त्या श्लोकात ३२ अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले, 'ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो.' असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले; पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काही तरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे निघून गेले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिली नंतर कंटाळून त्यांना झोप लागली आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद आणि त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते बुधकौशिक ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे. 

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।। तथा लिखितवान्प्रात:प्रबुद्धो बुधकौशिकः ।। 

आणि ती दोन अक्षरे जी शंकरांनी स्वत:कडे ठेवली ती म्हणजे 'राम'!

श्रीरामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व काय?

श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना 'मर्यादा पुरुषोत्तम' असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल, की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. श्रीरामरक्षा पठणाने वाणीवरही योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते. ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत रामरक्षेचे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊ वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे.

रामनामाचा महिमा

आपण कधी विचार केला आहे का? आपण 'राम-राम' दोन वेळेस का म्हणतो? कारण 

र = अक्षरमालिकेतील २७वे व्यंजन

आ = अक्षरमालिकेतील दुसरा स्वर 

म = अक्षरमालिकेतील २५वे व्यंजन 

यांची बेरीज होते ५४. 

आपण दोनदा राम उच्चारले तर राम + राम (५४+५४) = १०८. आपण जी गळ्यात जपमाळ घेतो त्यात १०८ मणी असतात. याचा अर्थ - आपण एका व्यक्तीला 'राम-राम' म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो. रामनाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= लक्ष्मण होते. नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात, हे मन शत्रूंचे हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते. सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते. 

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल ही माहिती सगळ्यांना असेलच- 

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः । 

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।। 

या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः (प्रथमा), रामं (द्वितीया), रामेण (तृतीया), रामाय (चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी), रामस्य (षष्ठी), रामे (सप्तमी), भो राम (संबोधन).

रामरक्षा - आरोग्यरक्षक कवच

श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?

रामनामकवच

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ।।४।।

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।।५।।

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ।।६।।

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ।।७।।

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ।।८।।

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ।।९।।

असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे! थोडक्यात, आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती नीट पाहा.

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।

न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ।। ११ ।।

म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलूनही पाहू शकत नाहीत!! 'छद्मचारिणः' हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना pseudopodium (स्युडोपोडियम) हा शब्द आपण शिकलेला असतो. अमीबासारखे जीव हे स्युडोपोडियम म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात! थोडक्यात, इथे 'राक्षस' म्हणजे सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुतसंहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.

आपण स्तोत्रे, मंत्र का म्हणतो हे जाणून घ्या. 'माझे आजी-आजोबा म्हणायचे म्हणून मी म्हणतो' असे म्हणणे योग्य नाही आणि 'पूर्वीच्या माणसांना असेल एवढा वेळ, आपल्याला तर वेळच नाही,' हे म्हणणेही बरोबर नाही. आपल्या देवी-देवता, सण-उत्सव परंपरा हे सारे निसर्गाशी जोडलेले आहे. अध्यात्म आणि मन:शांती याभोवती सारे गुंफलेले आहे. आज आपण जी मानसिक शांतता शोधण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठीच तर ही स्तोत्रे आणि मंत्र यांचे नियोजन आहे. आता हे सिद्ध झाले आहे, की या स्तोत्रांच्या किंवा मंत्रांच्या उच्चाराने खरंच आपल्या भोवतीचे वातावरण बदलते. त्या लहरींनी सकरात्मकता आपल्यात निर्माण होते. श्रद्धा ही खूप शक्ती देते. जे अशक्य वाटते ते साध्य होऊ शकते. ते श्रद्धास्थान आपल्याला आपले देवी-देवता देतात. आजच्या पिढीने हे समजून ते आचरणात आणावे. आज जग ज्या शांततेच्या शोधात आहे, त्या शांततेचे गुपित आपल्या पूर्वजांना कधीच उमगले आहे. तेच तर आहे या सगळ्या हिंदू संस्कृतीत! तेव्हा श्रीरामनवमीच्या निमित्ताने आपण आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे डोळसपणे पालन करू या. आपल्या पुढच्या पिढीला हा वारसा देऊ या. तेव्हाच आपली संस्कृती टिकणार आहे.

(संकलित माहिती)

संदर्भ : रामरक्षेचे अंतरंग - यू-ट्यूब मालिका (भाग दोन व तीन)

संतसाहित्य वेबसाइट

वेबदुनिया वेबसाइट

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-03-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 140 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-03-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 140 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 3 Comments

M
Madhuri Gohad
27-03-2026 07:56 AM

धनश्री लेले यांनी रामरक्षेवर लिहिल्यानंतर त्यावर भाष्य करणं अवघड होतं...पण कौमुदी तू ते अवघड धनुष्य सहजरित्या उचललं...छान माहितीपूर्ण लेख लिहिला आहेस. छान माहिती मिळाली.

S
Sushama Deogaokar
26-03-2026 12:07 PM

खूपच छान लेखन केलेस कौमुदी. शुभेच्छा 💐💐.

S
Sharad Godbole
26-03-2026 11:53 AM

खुपचं छान इतक्या दिवस आपण नुसती‌ रामरक्षा म्हणत होतो आता लेख वाचून रामरक्षा म्हणताना त्याच सामर्थ्य कळेल.कायम संग्रही ठेवावा असा लेख. अमृत महाराष्ट्र व लेखिका सौ‌ कौमुदी परांजपे हीचे आभार

Write a Comment
0 / 50 words
Advertisement