नामवंत अभिनेते राजा गोसावी यांचा २८ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचा अल्प परिचय...
राजा गोसावी हे प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत 'विनोदाचा राजा' म्हणत असत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथे २८ मार्च १९२५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते. मेळे, गाणी, नकला आणि नाटके यांची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. सुरुवातीला राजा गोसावी गंगाधरपंत लोंढेंच्या राजाराम संगीत नाटक मंडळीत आणि दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्स या चित्रपटनिर्मिती संस्थेत लहानमोठी कामे करत होते. नंतर दामूअण्णा मालवणकरांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते प्रॉम्प्टर म्हणून काम करायला लागले. त्यांच्या भावबंधन या मराठी नाटकामध्ये त्यांना पहिल्यांदा रखवालदाराची भूमिका मिळाली. त्यानंतर या नाटकातील विविध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यांना मिळाली.
राजा गोसावी यांनी चित्रपटगृहामध्ये तिकीटविक्रेता म्हणूनही काम केले आहे. १९५२मध्ये दत्ता धर्माधिकारी यांच्या 'अखेर जमलं' या विनोदी चित्रपटामधून राजा गोसावींनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी आलेल्या राजा परांजपे दिग्दर्शित 'लाखाची गोष्ट' या चित्रपटामध्ये त्यांनी राजा परांजपे यांच्या मित्राची व्यक्तिरेखा साकारली. एक लाख रुपये एका महिन्यात खर्च करून दाखवण्याच्या मुलीच्या वडिलांच्या विचित्र अटीमुळे नायकाची आणि त्याच्या मित्राची होणारी तारांबळ यातून या चित्रपटात विनोदनिर्मिती करण्यात आली आहे. अडचणीत असलेल्या जिवलग मित्राला बाहेर काढण्यासाठी केलेली धडपड यात त्यांनी अचूक साकारली. यातील राजा गोसावींचा अभिनय सहजसुंदर होता.
राजा गोसावींनी त्यानंतर अबोली, महात्मा, बोलविता धनी, सौभाग्य (१९५३), शुभमंगल, बेबी (१९५४), पुनवेची रात, गंगेत घोडं न्हालं (१९५५), आंधळा मागतो एक डोळा, जगावेगळी गोष्ट (१९५६), गाठ पडली ठकाठका (१९५६), आलिया भोगासी, देवघर, झालं गेलं विसरून जा (१९५७), दोन घडीचा डाव (१९५८), अवघाचि संसार, पैशांचा पाऊस (१९६०), वरदक्षिणा, भाग्यलक्ष्मी (१९६२), वाट चुकलेले नवरे (१९६४), कामापुरता मामा (१९६५), येथे शहाणे राहतात (१९६८), या सुखांनो या (१९७५) इत्यादी विनोदी, सामाजिक आणि तमाशाप्रधान चित्रपटांत भूमिका केल्या. वसंत पिक्चर्सचे निर्माते शरश्चंद्र गुण्ये यांनी राजा गोसावींची लोकप्रियता पाहून त्यांनाच तिहेरी भूमिकेत दाखवत राजा गोसावीची गोष्ट (१९५८) हा चित्रपट काढला. यात त्यांनी रंगवलेली मध्यमवर्गीय शहरी नायकाची भूमिका रसिकांना भावली. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या 'बाप माझा ब्रह्मचारी' या चित्रपटात राजा गोसावी यांनी वेडा बाळ आणि नितीन राजहंस अशा दोन वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका त्यांनी सहज पेलल्या.
काका मला वाचवा (१९६६) या चित्रपटामध्ये त्यांनी विजयकुमार या चित्रकाराची भूमिका केली आहे. असला नवरा नको ग बाई (१९७६) या चित्रपटामध्ये त्यांनी ग्रामीण ढंगाचे इरसाल पात्र रंगवले. हा खेळ सावल्यांचा (१९७६) यासारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची लक्षवेधी भूमिका केली. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटांत गंभीर भूमिका सहजरीत्या साकारल्या. राजा गोसावींनी मराठी चित्रपटांमध्ये कारकीर्द गाजवत असताना मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. उधार उसनवार (भीमराव वाघमारे), एकच प्याला (तळीराम), करायला गेलो एक (हरिभाऊ हर्षे), कवडीचुंबक (पंपूशेट), घरोघरी हीच बोंब (दाजिबा), डार्लिंग डार्लिंग (प्रभाकर), तुझे आहे तुजपाशी (श्याम), नटसम्राट (गणपतराव बेलवलकर), पुण्यप्रभाव (नूपुर, सुदाम, कंकण), प्रेमसंन्यास (गोकुळ), भाऊबंदकी (नाना फडणीस), भावबंधन (रखवालदार, महेश्वर, कामण्णा आणि धुंडीराज), याला जीवन ऐसे नाव (नाथा), लग्नाची बेडी (अवधूत, गोकर्ण), संशय कल्लोळ (फाल्गुनराव, भादव्या) इत्यादी अनेक सामाजिक, विनोदी आणि कौटुंबिक नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका केल्या. नाटकात संवाद म्हणताना त्यांचा हजरजबाबीपणा त्यांच्या अनेक नाटकांतून दिसून येतो.
वसंत सबनीस लिखित 'सौजन्याची ऐशीतैशी' या विनोदी नाटकामध्ये राजा गोसावींनी नाना बेरके हे बनेल पुरुषाचे पात्र केले होते. शेजाऱ्यांशी असलेला वाद या किरकोळ विषयावर बेतलेले हे नाटक त्यांची हजरजबाबी विनोदी शैली आणि प्रभावी शब्दफेक यांमुळे गाजले. त्यांच्या रंगश्री नावाच्या नाट्यसंस्थेमार्फत त्यांनी अनेक जुनी आणि नवीन नाटके मराठी रंगभूमीवर आणली. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक यशस्वी प्रयोग केले. १९५० ते १९८० अशी तीन दशके राजा गोसावींनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. निरागस आणि बोलका चेहरा, सहज संवादफेक करून हशा मिळवण्याचे कौशल्य ही त्यांच्या अभिनयाची बलस्थाने होती. शहरी, मध्यमवर्गीय, भाबडा, निरागस असा नायक त्यांनी अनेक चित्रपटात रंगवला. शहरी मध्यमवर्गीयांना आपल्यातलाच कोणीतरी आहे असे वाटावे, असे त्यांचे रंगरूप आणि शरीरयष्टी होती. परंतु नैसर्गिक अभिनय आणि मिश्किल विनोदी संवाद या जोरावर त्यांनी आपली चित्रपट कारकीर्द गाजवली. कारकीर्दीच्या सुरुवातीला आणि मध्यावर त्यांनी विनोदी अभिनेते शरद तळवलकर आणि ज्येष्ठ नाटककार दामूअण्णा मालवणकर यांच्यासोबत उत्तमोत्तम चित्रपट आणि नाटके केली. राजा गोसावींनी त्यांच्या कारकीर्दीत पंच्याऐंशीपेक्षा अधिक चित्रपट व सुमारे चाळीस नाटकांमधून अभिनय केला.
१९९५ साली अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान राजा गोसावी यांना मिळाला. नाट्यपरिषदेने बालगंधर्व हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. २८ फेब्रुवारी १९९८ रोजी राजा गोसावी यांचे पुण्यात एका नाटकावेळीच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ आणि गौरवार्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही संस्था राजा गोसावी बालनाट्य शिबिराचे आयोजन दर वर्षी करते. अशा या कलाकाराला वंदन!
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment