पेशवाईवरील लेखमालेतील अकरावा लेख...
मागील लेखात आपण थोरले माधवराव पेशवे यांच्याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण सवाई माधवराव यांच्याविषयी माहिती घेऊ या. सवाई माधवराव हे मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा होते. त्यांचा जन्म १८ एप्रिल १७७४ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. नारायणराव आणि गंगाबाई या दाम्पत्यापोटी त्यांचा जन्म झाला. सवाई माधवराव यांच्या जन्माआधीच त्यांच्या वडिलांची अर्थात नारायणराव पेशवे यांची हत्या करण्यात आली. सवाई माधवरावांचे बालपण पुरंदर किल्ल्यावर लष्करी बंदोबस्तात गेले. पेशव्यांना वाढविण्याची जबाबदारी कारभाऱ्यांवर म्हणजे नाना फडणवीसांवर आली. साहजिकच लिहिणे-वाचणे, हिशेब ठेवणे, घोड्यावर बसणे, कसरत करणे याचे जुजबी शिक्षण त्यांना मिळाले; पण मुत्सद्दी माणसांच्या गाठीभेठी, राजकारणाच्या वाटाघाटी, लष्करी मोहीम यांपासून हे पेशवे वंचित राहिले. त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी आई गंगाबाई मरण पावली. त्यामुळे त्यांना खास मायेचे कोणीच उरले नाही.
पेशवाईच्या उत्तरकाळात गृहकलहामुळे निर्माण झालेल्या चमत्कारिक वेळी जन्म झाल्यामुळे या बालपेशव्यासंबंधी मराठी राज्याच्या अपेक्षा उंचावल्या. कर्तबगार चुलते थोरले माधवराव यांच्यापेक्षा मोठी कामगिरी याच्या हातून पार पडेल, या भावनेने त्यांमना सवाई माधवराव हे नाव प्राप्त झाले. जन्मानंतर चाळीस दिवसांनी २८ मे १७७४ रोजी त्यांना सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. काही दगाफटका होऊ नये, म्हणून माधवरावांना पुरंदर किल्ल्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर कुणबिणी, नोकरचाकर, पाणक्ये, भटभिक्षुक, कारकून अशा मंडळींच्या सहवासात पेशवे मोठे झाले. पाच वर्षांनंतरच पुरंदरची थंड हवा सोसेना म्हणून पेशव्यांसह सर्व मंडळी पुण्यास आली. १० फेब्रुवारी १७८३ रोजी थत्ते कुटुंबातील रमाबाई या मुलीशी त्यांचे थाटाने पहिले लग्न करण्यात आले. (१७९३ साली या पत्नीचा मृत्यू झाला.) यानंतर गणेश वि. गोखले यांच्या यशोदाबाई या मुलीशी दुसरे लग्न झाले. पुण्याच्या शनिवारवाड्यात श्रावण मासातील सण, दक्षिणावाटप, गणपती उत्सव, दसरा, होळी आदी सण आणि वाड्यातील भोजने यांत पेशव्यांचे जीवन व्यतीत होत होते. पुणे-नाशिक-वाई-सातारा या परिसरापलीकडे त्यांचा प्रवास झाला नाही.
सवाई माधवरावांच्या वेळी पहिले इंग्रज-मराठे युद्ध (१७७४-८२), टिपूशी युद्ध (१७८६-८७), टिपूविरुद्ध केलेली श्रीरंगपट्टणची इंग्रज-निजामासह संयुक्त मोहीम (१७९०-९२), खर्ड्याचे युद्ध (१७९५), पाटीलबाबा शिंदे यांनी मोगल बादशाही ताब्यात घेऊन उत्तरेकडील राजेरजवाडे आणि मुस्लिम संस्थानिक यांच्याशी केलेली युद्धे (१७८४-१७९१) असे अनेक युद्धप्रसंग घडले आणि मराठ्यांनी अखिल हिंदुस्थानात पुन्हा नावलौकिक मिळविला. या सगळ्यात जास्त गाजली ती खर्ड्याची लढाई. सर्व मराठे सरदारांनी एकदिलाने लढलेली शेवटची लढत असे याचे वर्णन करता येईल. थोरल्या माधवरावांनी राक्षसभुवनच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यानंतर वेळोवेळी चौथाई जमा केली होती; मात्र थोरल्या माधवरावांच्या निधनानंतर त्याने चौथाई देणे बंद केले होते. त्यातच दिल्ली दरबारातून मराठ्यांना वकिली मुतलक ही पदवी मिळाली. त्यामुळे निजामाचा आणखीनच जळफळाट झाला. निजामाच्या दिवाणाने ही संधी साधून त्याला मराठ्यांविरुद्ध भडकवले. त्याचदरम्यान महादजी शिंदे आणि हरिपंततात्या फडके हे दोघेही मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे मराठेशाहीत एकप्रकारची पोकळी निर्माण झाली होती. या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन निजामाने मराठ्यांविरुद्ध युद्ध करण्याचे ठरवले.
या वेळी पुण्यात सवाई माधवराव पेशवेपदी होते. राज्यकारभाराची सारी सूत्रे नाना फडणवीस यांच्याकडे होती. गोविंदराव काळ्यांमार्फत निजामाच्या कारभारातील साऱ्या गोष्टींची माहिती नानांना मिळत होती. १७९४मध्ये निजामाच्या फौजा बिदरपूर पुढे येऊन अहिल्यानगरमार्गे पुण्याच्या दिशेने येत आहेत, ही खबर नाना फडणवीस यांना मिळाली. त्या वेळी पुण्याच्या बंदोबस्ताकरिता माधवराव कानडे यांची नेमणूक करण्यात आली. पेशव्यांच्या फौजांनी कूच केले. पुण्याच्या पूर्वेकडील घोडनदी ओलांडून श्रीगोंद्याच्या बाजूने पेशव्यांच्या फौजा निघाल्या. सीना नदीच्या काठावर पेशव्यांच्या फौजांचा पहिला तळ पडला. निजामाचे सैन्यसुद्धा खर्ड्याजवळ होते. नाना फडणवीस यांनी या मोहिमेची सारी सूत्रे परशुराम पटवर्धन यांच्याकडे सोपवली होती. त्या वेळी मराठ्यांकडे ८३ हजार घोडदळ, ३८ हजार पायदळ आणि १९२ तोफा होत्या. निजामाकडे ४५ हजार घोडदळ, ४४ हजार पायदळ, १०८ तोफा होत्या. ११ मार्च १७९५ रोजी निजामाच्या फौजांनी घोडनदीकडे कूच केले. मराठे आणि निजाम यांच्यात घनघोर युद्ध झाले; पण मराठे सरदारांनी एकजुटीने व्यूहरचना केली होती. निजामाच्या फौजांची पीछेहाट होऊ लागली. निजाम पळून गेला आणि खर्ड्याच्या किल्ल्यात जाऊन लपला. आता मराठ्यांपुढे आपला टिकाव लागू शकणार नाही, याची जाणीव होऊन निजामाने मराठ्यांशी तहाची बोलणी करण्यास संमती दिली. वेळोवेळी निजामाने केलेला विश्वासघात लक्षात घेता, त्याला जीवनदान देणे योग्य नव्हते. परंतु नाना फडणवीस यांना इंग्रजांचे संकट दिसत होते. अशा परिस्थितीत निजाम आपल्या कामी येऊ शकतो या जाणिवेने त्यांनी निजामाला जीवनदान दिले. या तहानंतर निजामाला जवळपास तीन कोटींची चौथाई द्यावी लागली. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीतील हा सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा विजय होता. त्यानंतर सातच महिन्यांत त्यांचे निधन झाले.
पेशव्यांच्या दरबारात आलेल्या चार्ल्स मॅलेट या इंग्रज वकिलाने सवाई माधवरावांविषयी अनेक तपशीलवार गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यावरून त्यांची शरीरयष्टी, स्वभाव आणि वर्तन यांवर प्रकाश पडतो. खर्ड्याच्या मोहिमेवरून पेशवे १७९५मध्ये परत आले. सवाई माधवराव यांनी २५ ऑक्टोबर १७९५ रोजी तापाच्या भरात शनिवारवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली कारंज्यावर उडी टाकली व २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ते मरण पावले. सवाई माधवराव यांना इतर पेशव्यांसारखे आपले कर्तृत्व सिद्ध करता आले नाही, तरी त्यांच्या अस्तित्वाने मराठ्यांची सत्ता एकवटून राहिली होती. त्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईत परस्परातील हेवेदावे, वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली व विघटनवादी प्रवृत्तीला ऊत आला. त्यानंतर २०-२२ वर्षांत इंग्रजांनी मराठ्यांची सत्ता नष्ट केली. पुढच्या भागात आपण आणखी एका शूर पेशव्यांची माहिती घेऊ या. (क्रमश:)
(संकलित)
(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)
१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!
२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध
३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध
४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय
५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १
६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २
७. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ
८. पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे
९. पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा
१०. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment