विनायक नावाच्या गावातील श्री सिद्धिविनायक मंदिर - अमृत महाराष्ट्र

विनायक नावाच्या गावातील श्री सिद्धिविनायक मंदिर

रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील पुरातन ठेवा

विनायक नावाच्या गावातील श्री सिद्धिविनायक मंदिर मुख्य फोटो
विनायक नावाच्या गावातील श्री सिद्धिविनायक मंदिर अतिरिक्त फोटो

गणपतीच्या नावाचे गाव म्हणून रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील विनायक गाव ओळखले जाते. या गावात सिद्धिविनायकाचे स्थान आहे. हे देऊळ गावात भर वस्तीत असल्याने भाविक येता-जाता या गणपतीचे दर्शन घेऊ शकतात. हे मंदिर हंबीराज काळचे, सुमारे ६५० वर्षांहून अधिक काळापूर्वीचे आहे. हंबीराज हा देवगिरी येथील यादव राजवटीतील सरदार होता. कोकणभूमीचा भाग त्याच्या आधिपत्याखाली होता. त्यानेच हे मंदिर बांधलेले आहे, असे रानवड व अलिबाग-नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखांवरून कळते. सध्या हे शिलालेख मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स या म्युझियममध्ये आहेत.

मंदिरातील गणेशाची मूर्ती ही काळ्या पाषाणात कोरलेली असून, विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच आहे, तर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती दोन फूट उंचीच्या आहेत. एकाच पाषाणावर गणपती व त्याच्या दोन बाजूंना रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत, हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. कारण अन्य कोणत्याही देवळामध्ये एकाच पाषाणावर गणपतीसह रिद्धी-सिद्धी असलेली अशी मूर्ती आढळून येत नाही. श्री विनायकाने आपले दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. श्री गजाननाने पीतांबर धारण केलेले आहे, तसेच डोक्यावर सुंदर नक्षी असलेला मुकुट आहे. श्री गणेशाच्या हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक, लाडू आहेत. रिद्धी-सिद्धीच्या हातात चवऱ्या आहेत. 

मूर्तीचा गोलाकार गाभारा दगडी आहे. मुस्लिमांनी मूर्तीचा विध्वंस करू नये म्हणून मंदिराचा कळस मशिदीच्या आकारासारखा बांधला होता. त्यामुळे १२व्या शतकात ही मूर्ती टिकून राहिली. या मंदिराच्या गाभाऱ्यातून कळसाचे दर्शन होते, हेदेखील या देवळाचे एक वैशिष्ट्ये आहे. गेली कित्येक वर्षे रोज सकाळी सूर्यनारायण विघ्नहर्त्याच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी मंदिरात किरणरूपाने येतात. सकाळी सव्वासातला सूर्यकिरण मूर्तीवर पडतात. देवळाच्या बाजूला एक तळे आहे. देवळाचा परिसर टापटीप व स्वच्छ आहे. या परिसरात एक विहीर आहे, त्यातून पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे.

मूर्तीच्या पाठीमागे सव्वातीन फूट उंचीचा प्राकृत भाषेतील शिलालेख आहे. शिलालेखाच्या वर सूर्य, चंद्र व कलश यांच्या आकृती आहेत, तसेच खालच्या बाजूला गद्धेगल म्हणजे वस्तूचा व जमिनीचा अपहार करणाऱ्यास दहशत घालणारे चित्र आहे. या शिलालेखाचे गूढ अनेक शतकांपासून उलगडत नव्हते. या गूढ शिलालेखाचा उलगडा १९४०मध्ये मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजच्या हिस्टॉरिकल ग्रुपने केला, हे अलीकडच्या काळात जुन्या कागदपत्रांचा शोध घेताना सापडले. या शिलालेखाचा मराठी अनुवाद नांदेड येथील इतिहास संशोधक प्रभाकर देव यांनी केलेला आहे.

या देवस्थानाची मालकी गेल्या नऊ पिढ्यांपासून घरत कुटुंबीयांकडे आहे. या देवळात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे येणे-जाणे होते. श्रीमंत पेशव्यांनी सन्मानाने घरत कुटुंबीयांना फजनदार हा किताब बहाल केला व आजूबाजूच्या शेतजमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला देण्यात आल्या. २००३ साली या मंदिराचा द्विशतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा झाला. या द्विशतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने रिद्धी-सिद्धी विनायकाची प्रतिमा असलेले एक नाणे काढण्यात आले. या नाण्याच्या छपाईचे काम उरण येथील रहिवासी मिंट टांकसाळमधील प्रोफेशनल कलाकार वसंत गावंड यांनी केले आहे. 

मूळ मूर्ती ही अत्यंत दुर्मीळ व पुरातन आहे. हल्लीचा भेसळयुक्त शेंदूर व तेलामुळे मूर्तीची हानी होऊ नये, या उद्देशाने पुरातत्त्व खाते व इतिहास संशोधक यांच्या सूचनेनुसार वसंत गावंड यांनी रिद्धी-सिद्धी विनायकाची हुबेहूब छोटी प्रतिकृती तयार केली आणि ती भक्तांच्या पूजनासाठी सभागृहात एका जागी विराजमान करण्यात आली आहे.

(संकलन - आनंद मालशे, सुधीर लिमये)

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 11:57 PM News publication time | Views: 26 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 11:57 PM News publication time | Views: 26 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement