स्थानिक लघुउद्योजकांना मिळाले बळ; ग्राहकांना मिळाल्या दर्जेदार वस्तू
भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम २० ते २२ मार्च २०२६ या कालावधीत भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनात स्थानिक लघुउद्योजकांच्या २१ स्टॉल्सवरून सव्वादोन लाख रुपयांच्या उत्पादनांची विक्री झाली. या उपक्रमामुळे स्थानिक लघुउद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, तर ग्राहकांना दर्जेदार व स्वदेशी उत्पादनांची खरेदी करता आली.
हस्तकला, घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे आदी विविध उत्पादने प्रदर्शनात मांडण्यात आली होती. नागपूर व साकोली येथील लघुउद्योजकांनीही यात सहभाग घेतला होता. या वेळी जिल्हा आरोग्य विभागातर्फे मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होत. तसेच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला. उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते.
उद्योगाच्या यशासाठी सक्षम बाजारपेठेची आवश्यकता असते. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम अमृत संस्थेतर्फे राबवला जातो. राज्याच्या विविध शहरांप्रमाणेच भंडाऱ्यातील उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक राजू नंदनवार, बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री. अग्रवाल , महाराष्ट्रीय ब्राह्मण सभेचे सचिव शेखर जोगळेकर, पूज्य सिंधी समाजाचे अध्यक्ष संतोष बलवानी यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित, विभागीय उपव्यवस्थापक ओंकार गांधी, नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, गोंदिया जिल्हा व्यवस्थापक कार्तिक तिवारी, अमृतमित्र पीयूष पुरोहित, आदित्य लुलू उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ. मधुरा मदनकर, नगरसेविका सौ. वृषाली ब्राह्मणकर, नगरसेविका रूपाली नेवारे यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. उपस्थित मान्यवरांनी लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
तीन दिवसांच्या या अमृतपेठ थेट बाजारपेठेमध्ये विविध लघुउद्योजकांनी आपले स्टॉल लावले होते. त्यात अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील अनेक उद्योजकांचा समावेश होता. त्यांच्या दर्जेदार हँडमेड व स्वदेशी उत्पादनांनी ग्राहकांना आकर्षून घेतले. प्रदर्शनातील २१ स्टॉल्सवरून या तीन दिवसांमध्ये सुमारे सव्वादोन लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली. घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, तसेच विविध गृहोपयोगी वस्तूंनी सजलेले स्टॉल्स ग्राहकांच्या गर्दीने भरून गेले होते. त्यात नागपूर जिल्ह्यातील दोन आणि साकोलीतील दोन उद्योजकांच्या स्टॉल्सचाही सहभाग होता.
प्राइड कॉन्व्हेंट येथील विद्यार्थ्यांची राष्ट्रपुरुष वेशभूषा स्पर्धाही या वेळी आयोजित करण्यात आली होती. प्राची चटप (आट्यापाट्या आंतरराष्ट्रीय खेळाडू), सूरजसिंह ठाकूर (भारोत्तोलन राज्यस्तरीय खेळाडू), प्रीतम राजाभोज, शतकवीर रक्तदूत शिवशंकर साकुरे यांचा गौरवही या वेळी करण्यात आला.
या उपक्रमातून उद्योजकांना ग्राहकांशी थेट संवादाची सुवर्णसंधी मिळाली आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाली. त्यामुळे हा उपक्रम लघुउद्योजकांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरला. ग्राहकांनी खरेदीतून स्थानिक उद्योजकांना पाठबळ दिले आणि त्यांना दर्जेदार व परवडणारी उत्पादने मिळाली. त्यामुळे दोन्ही घटकांमध्ये मजबूत सेतू निर्माण झाला. भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रम विविध भागांत आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनाला अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश खराटे, चंद्रपूर जिल्हा उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, ललित मुंदडा, हेमंत कविमंडन, राजकुमार भोजवानी आदी अनेक मान्यवरांनीही भेट देऊन पाहणी केली व खरेदीतून स्थानिक उद्योजकांना पाठबळ दिले.
नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे हे प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमृत संस्थेचे भंडारा जिल्हा व्यवस्थापक ओमकार हरदास, अमृतमित्र हेमंत चंदवासकर, अमृतसखी साक्षी जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, कोणत्याही प्रकारचे श्रेय न घेता हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या अनेकांनी सहकार्य केले, त्यांचे ओमकार हरदास यांनी आभार मानले.
सहभागी उद्योजकांनी उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रदर्शनांचे आयोजन नियमितपणे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment