तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त (२७ मे) त्यांचा कार्यपरिचय...

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मुख्य फोटो
मुख्य फोटो

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळाजी आणि आईचे नाव चंद्रभागा होते. त्यांचे वडील बंधू वेणीमाधवशास्त्री पुढे आयुर्वेदाचार्य म्हणून प्रसिद्धीला आले. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. १९२३ साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली. इंग्‍लिश भाषा व आधुनिक पाश्चिमात्य ज्ञानविज्ञाने यांचा त्यांनी स्वप्रयत्नाने सखोल अभ्यास केला. वाई येथेच राहून शास्त्रीजींनी प्राज्ञ पाठशाळेचे व मराठी विश्वकोशाचे कार्य आणि आपला अभ्यास अखंडपणे चालू ठेवला. प्राज्ञ पाठशाळेचे वातावरण सनातनी पढिक पांडित्याचे नव्हते. ते पुरोगामी चिकित्सेचे व राष्ट्रीय स्वरूपाचे होते. परिणामतः राष्ट्रीय व सामाजिक आंदोलनांत भाग घेण्याची प्रेरणा या वातावरणातून शास्त्रीजींना लाभली. महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारणकार्यास शास्त्रीजींनी हिंदूधर्मशास्त्र पूरक भाष्य तयार करून दिले. १९३० व १९३२ साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना प्रत्येक वेळी ६-६ महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. १९३६नंतर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीचे ते क्रियाशील सदस्य झाले. १९४८मध्ये हा पक्ष विसर्जित होईपर्यंत ते त्याचे सदस्य होते. १९४०पर्यंत व पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाशी ते एक विचारवंत भाष्यकार म्हणून निगडित होते.

तर्कतीर्थांच्या नेतृत्वाने प्राज्ञ पाठशाळेला एका व्यापक सांस्कृतिक कार्यकेंद्राचे स्वरूप लाभले. वाईमध्ये हरिजन विद्यार्थ्यांचे वसतिगृह, हातबनावटीचा कागद कारखाना, अद्ययावत मुद्रणालय इ. उपक्रम त्यांनी यशस्वीपणे अंमलात आणले. वाईच्या महाविद्यालयाचेही ते संस्थापक-सदस्य आहेत. प्राज्ञ पाठशाळेतर्फे धर्मकोशाच्या संपादनाचे मौलिक कार्य त्यांनी हाती घेतले. या कोशाचे ११ खंड प्रसिद्ध झाले असून, त्यात कुटुंबसंस्था, हिंदुसंस्कार, जाती, विवाह, मालमत्ता याचप्रमाणे हिंदूधर्मविधी, नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान इत्यादी विषयांसंबंधी प्राचीन शास्त्रांतील ग्रांथिक माहिती व्यवस्थितपणे संकलित केलेली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सुरुवातीपासून म्हणजे १९६० पासून शास्त्रीजी अध्यक्ष होते. मंडळातर्फे भाषा-साहित्यविषयक अनेक योजना कार्यान्वित झाल्या. त्यांपैकी प्रमुख प्रकल्प वीस खंडांच्या मराठी विश्वकोशाचा आहे. प्राचीन-अर्वाचीन सर्व ज्ञानविज्ञाने मराठीतून देण्याचे मौलिक कार्य शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाखाली चालू होते. शास्त्रीजींनी व्याख्याने, परिषदा इत्यादी निमित्ताने भारतभर प्रवास केला. अमेरिका, ब्रह्मदेश, रशिया तसेच युरोपीय, आशियाई आणि आफ्रिकी देशांनाही त्यानी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून किंवा स्वतंत्रपणे निमंत्रित म्हणूनही भेटी दिल्या आहेत. 

सोरटी सोमनाथाच्या जीर्णोद्धाराचे मुख्य पौरोहित्य त्यांनीच केले (१९५१). कुकुरमुंडे येथील सनातन धर्मपरिषद (१९२५) व वाराणसीचे अखिल भारतीय संस्कृत पंडितांचे संमेलन (१९२९) यांत भाग घेऊन शास्त्रीजींनी धर्मसुधारणेचे सभाष्य समर्थन केले. भारतीय संविधान संहितेचे संस्कृत भाषांतरही त्यांनी केले. हिंदी राष्ट्रभाषेच्या प्रचारकार्याशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९५४). याखेरीज अनेक विभागीय व प्रादेशिक मराठी साहित्य संमेलनांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषवली.

शास्त्रीजींची ग्रंथसंपदा मोजकी, पण मौलिक आहे. शुद्धिसर्वस्वम् (१९३४), आनंदमीमांसा (१९३८), हिंदू धर्माची समीक्षा (नागपूर विद्यापीठात रा. ब. परांजपे व्याख्यानमालेत दिलेली तीन व्याख्याने, १९४१), जडवाद (१९४१), ज्योतिनिबंध (म. फुल्यांचे चरित्र आणि कार्य– १९४७), वैदिक संस्कृतीचा विकास (१९५१, द्वितीय आवृत्ती १९७४), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत (१९७३) हे त्यांचे ग्रंथ मान्यता पावले आहेत. राजवाडे लेखसंग्रह (१९६४) आणि लोकमान्य टिळक लेखसंग्रह (१९६९) हे त्यांनी संपादित केलेले उल्लेखनीय ग्रंथ होत. यांशिवाय अनेक लेख व प्रस्तावना त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांनी हिंदू धर्माची समीक्षा ऐतिहासिक व समाजशास्त्रीय पद्धतीने केली आहे. वैदिक संस्कृतीचा विकास हा त्यांचा एक प्रचंड प्रबंध आहे. मुळात पुणे विद्यापीठात श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे, इचलकरंजी-व्याख्यानमालेत दिलेली ही सहा व्याख्याने आहेत (१९४९). त्यांत वेदकालीन संस्कृती, इतिहास, पुराणे व रामायणाची संस्कृती, बौद्ध आणि जैन धर्मांचे कार्य आणि आधुनिक भारतातील सांस्कृतिक आंदोलन या विषयांचा सखोल आणि ऐतिहासिक दृष्टीने घेतलेला परामर्श आहे. भारतातील वैदिक संस्कृती परिवर्तनक्षम आहे. आधुनिक विज्ञानदृष्टी व मानवतावाद यांच्या निकोप संवर्धनाचे तिच्यात आंतरिक सामर्थ्य आहे व म्हणून आधुनिक क्रांतियुग आणि वैदिक संस्कृतीतील मूलभूत अध्यात्मयोग यांची सांगड घातली पाहिजे, हा या ग्रंथाचा निष्कर्ष आहे. सर्वोत्कृष्ट भारतीय ग्रंथांना साहित्य अकादमी १९५५ पासून पुरस्कार देते. असा पुरस्कार लाभलेला हा पहिला मराठी ग्रंथ आहे. इतिहासाचार्य राजवाडे आणि लोकमान्य टिळक यांचे नमुनेदार लेखसंग्रह संपादित करून शास्त्रीजींनी त्यांना अभ्यासपूर्ण व अत्यंत विचारप्रवर्तक प्रस्तावना लिहिल्या आहेत. आधुनिक मराठी साहित्य व त्याची समीक्षा, संस्कृतातील रससिद्धांत, मराठी संतांचे कार्य यांसंबंधीही त्यांनी अनेक लेखांतून नवा दृष्टिकोण मांडलेला आहे.  

महाराष्ट्रात बुद्धिवादी विचारवंतांची एक थोर परंपरा आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, गो. ग. आगरकर, लो. टिळक, वि. दा. सावरकर, महर्षी शिंदे इत्यादी विचारवंतांच्या परंपरेतच शास्त्रीजींचे कार्य मोडते. प्राचीन आचार्यपरंपरेची निःस्वार्थ लोकशिक्षणाची निष्ठा, तर्कशुद्ध दृष्टिकोन, पूर्व-पश्चिमी ज्ञानविज्ञानांचा प्रचंड व्यासंग, स्पष्ट आणि निःस्पृह विचारप्रतिपादन व सामाजिक आणि राष्ट्रीय उद्धाराची कळकळ हे या परंपरेचे विशेष आहे. भारत सरकारने त्यांना १९७६मध्ये पद्मभूषण व १९९२ मध्ये पद्मविभूषण देऊन गौरव केला. २७ मे १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. या थोर विचारवंताला शतश: नमन!

(स्रोत - मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement