अमृत संस्थेच्या उपक्रमाचा मिळाला लाभ
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. या संस्थेच्या मोफत ड्रोन प्रशिक्षणवर्गाचा लाभ सांगली जिल्ह्यातील अथर्व पटवर्धन या तरुण शेतकऱ्याला मिळाला आहे.
अमृत संस्था वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी लक्ष्यित घटकातील लाभार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करते. ड्रोनचा विविध क्षेत्रांतील वाढता वापर बघता प्रशिक्षित ऑपरेटरची आवश्यकता भासणार आहे. तसेच व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. म्हणून अमृत संस्थेने ड्रोन प्रशिक्षणवर्ग सुरू केला आहे. सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील कुमठे येथील तरुण शेतकरी अथर्व राजेंद्र पटवर्धन याने या प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेकडे अर्ज केला होता. शेती व्यवसायातील ड्रोन वापर या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली होती. त्याने कर्जत येथे हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
हे प्रशिक्षण अतिशय उपयोगी व मार्गदर्शक असल्याचे अथर्व याने सांगितले. 'थिअरी व प्रॅक्टिकल अशा दोन्ही स्वरूपाची सखोल माहिती आणि मार्गदर्शन मिळाले. तसेच अशा पद्धतीचे प्रशिक्षण व्यवसाय सुरू करण्यासाठी व उद्योजक होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे,' असे त्याने सांगितले.
'अमृत संस्थेच्या या योजनेमुळे मला मोठी संधी मिळाली आहे. ड्रोन प्रशिक्षण आताच्या काळात खूप गरजेचे असून मी या प्रशिक्षणाचा माझ्या व्यवसायासाठी सर्वोत्तम उपयोग करीन. अमृत संस्थेचा मी मनापासून आभारी आहे,' अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा पातळीवर मार्गदर्शन करून समन्वय साधल्याबद्दल अथर्वने अमृत संस्थेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र शरद जहागीरदार यांचे विशेष आभार मानले. अथर्वचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अमृत संस्थेने त्याचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लक्ष्यित गटातील युवक-युवतींनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य संधी मिळाल्यास छोट्या शहरातील विद्यार्थीही चांगले प्रशिक्षण मिळवून स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. अमृत संस्था अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहून त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२८७६६
पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी,
अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर, राजवाडा, सांगली
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment