मुख्यमंत्री वयोश्री योजना - ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारवड

आर्थिक दुर्बल घटकांना दिलास देणारी योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना - ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारवड मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागामार्फत राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. वाढते वय, अशक्तपणा, आरोग्याच्या समस्या आणि दैनंदिन जीवनातील अडचणी लक्षात घेऊन ज्येष्ठांना आर्थिक व वैद्यकीय साह्य मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहायक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवून ठेवणे सोपे होणार आहे.

योजनेचा उद्देश राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक साह्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. श्रवणदोष, दृष्टीदोष, चालण्यास अडचण, अशक्तपणा अशा समस्यांमुळे अनेक ज्येष्ठांना दैनंदिन जीवनात अडथळे येतात. अशा नागरिकांना सहायक साधने खरेदी करता यावीत, तसेच योगोपचार, मानसिक आरोग्य सेवा आणि पुनर्वसन सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) पद्धतीने दिली जाते. या पैशांतून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक वैद्यकीय किंवा सहायक उपकरणे खरेदी करता येतात.

पात्रता निकष

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत :

- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

- अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.

- लाभार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

- त्याने मागील तीन वर्षांत शासनाकडून मोफत सहायक उपकरणांचा लाभ घेतलेला नसावा. (जिल्ह्यातील या योजनेच्या किमान ३० टक्के लाभार्थी महिला असतात.) आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) रेशन कार्ड किंवा पेन्शनचा पुरावा, स्वयंघोषणापत्र

अर्जप्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित जिल्ह्याच्या समाजकल्याण विभाग कार्यालयाकडे स्वीकारले जातात. शासनाने यासाठी स्वतंत्र पोर्टलही उपलब्ध करून दिले आहे. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाशी संपर्क साधावा.

अधिकृत संकेतस्थळ : https://cmvayoshree.mahait.org/

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 12:34 PM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 12:34 PM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement