भंडारा जिल्ह्यातील पवनी हे प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक वैभव लाभलेले श्री क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
भंडारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र पवनी हे नागपूरपासून ५० कि.मी. अंतरावर, वैनगंगा नदीच्या किनारी वसलेले गाव असून दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. पुरातत्व विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुराणात पवनीला 'पद्मावती पुरी' असे नाव लाभले आहे. ही भूमी सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. येथील श्री दत्त मंदिर हे श्रद्धा व भक्तीचे प्रमुख केंद्र असून दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. पवनीचा संबंध परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (टेंबे स्वामी) यांच्या पावन स्मृतींशी जोडलेला आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती दत्तावतार मानल्या जाणाऱ्या स्वामी महाराजांनी पवनी येथे वास्तव्य करून दत्तभक्तीचा प्रसार केला. त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला दत्तसंप्रदायात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्री दत्त मंदिरातील भक्तिमय वातावरण, धार्मिक परंपरा आणि स्वामी महाराजांच्या स्मृती यांमुळे पवनी हे विदर्भातील एक महत्त्वाचे दत्त तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. श्री महाराजांचा १९ वा चातुर्मास शके १८३१ मध्ये या स्थानावर संपन्न झाला.
अशा या पावन भूमीत अखंड भारतात प्रसिद्ध असलेल्या महान संत दत्तावतारी श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) इ.स. १८३९ ते १९०९ या काळात पवनी येथे विठ्ठल मंदिर व मुरलीधर मंदिरात मुक्कामाला होते. उज्जैनला प्रथम संन्यास घेतल्यावर गंगोत्रीपासून रामेश्वर व द्वारकेपासून त्यांनी राजमहेंद्रीपर्यंत पायी प्रवास केला. आयुष्यात ते कधीही कोणत्याही वाहनात बसले नाहीत. त्यांना नेहमी दत्तप्रभूंकडून संदेश मिळत असे. दत्तप्रभूंच्या आज्ञेने धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाच्या विविध भागात २४ चातुर्मास केले. त्यात महाराष्ट्रातील पवनी येथेही एक चातुर्मास केला. चातुर्मास चालू असताना पुण्याहून नरसोबाची वाडी येथून लोक येत असत. चातुर्मास चालू असताना अनंतचतुर्दशीच्या दिवशी पुण्याचे प्रसिद्ध संत योगिराज श्री गुळवणी महाराज यांना स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला.
महाराजांसोबत संपूर्ण चातुर्मास सीताराम महाराज (झीरी), बडनेरा (परभणीजवळील) गुंज संस्थानचे श्री योगानंद सरस्वती यांचेही पवनी येथील काळीकरांच्या वाड्यात वास्तव्य होते. पवनी येथील विठ्ठल मंदिरात औदुंबर वृक्षाखाली महाराज समाधी घेत असत. बऱ्याच लोकांना येथे महाराजांनी अनुग्रह दिला व त्यांचा उद्धार केला. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती ज्या पाटावर बसत, तो पाटही येथे जतन करून ठेवला आहे. मुरलीधर मंदिराच्या कळसावर असलेले विशाल सोन्याचे चक्र त्यांच्या गत वैभवाची साक्ष देते.
सर्व दत्तसंप्रदायी मंडळींनी निदान एक पावन क्षेत्र म्हणून तरी नागपूरजवळच असलेल्या या पवनी दत्तभक्तांच्या पंढरीला आवर्जून भेट द्यावी.
|| पवित्र भूमी असेही दत्तभक्तांची पंढरी ||
|| वसतीला असती येथे वासुदेवानंद सरस्वती ||
|| निमित्य दर्शनाचे करून जाऊ या पावन स्थळी ||
- भालचंद्र चिंचालकार, प. पु. श्री. वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी सेवा मंडळ, पवनी
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment