सोलापुरात 'अमृत'चे उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न; वैशाली कुलकर्णींना मिळाली व्यवसायाची नवी दिशा
सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या सोलापूर कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेले उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. स्थानिक पातळीवरील नवउद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गामध्ये सोलापूर येथील रहिवासी असलेल्या महिला उद्योजक सौ. वैशाली कुलकर्णी यांची पाच दिवस सक्रिय उपस्थिती होती. आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि त्याला अधिक व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी या ईडीपी प्रशिक्षणाची आपल्याला अत्यंत गरज होती, असे वैशाली कुलकर्णी यांनी नमूद केले. ५ दिवसांच्या या प्रशिक्षण कालावधीत त्यांना व्यवसायाचे नियोजन, व्यवस्थापन आणि पुढील वाढीसाठी आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना वैशाली कुलकर्णी म्हणाल्या, "अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे मला माझ्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठा आधार आणि योग्य दिशा मिळाली आहे. या प्रशिक्षणाचा मला अत्यंत चांगल्या पद्धतीने लाभ झाला आहे." त्यांनी 'अमृत' संस्थेचे मनापासून आभार मानले आणि संस्थेच्या या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे उद्योजकांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले. तसेच, "आम्ही भविष्यात नेहमी अमृत संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. अमृतच्या अशा उपक्रमांमुळे सोलापूर आणि परिसरातील अनेक नवीन व्यावसायिकांना उभारी मिळत असून संस्थेच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment