हजारो झाडांचे जंगल उभे करणाऱ्या फॉरेस्ट मदर देवकीअम्मा यांच्या कार्याचा अल्प परिचय...
एका भीषण कार अपघातात शरीराला आलेल्या परावलंबित्वामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या देवकीअम्मांना एका क्षणी त्यांच्या आयुष्याचे ध्येय सापडले. त्यांनी झाडे लावण्यास सुरुवात केली. झाडे लावता लावता एका जंगलाची निर्मिती झाली. त्यांनी जे जंगल विकसित केले त्याला ‘तपोवन’ असे नाव देण्यात आले. आजही वयाच्या ९२व्या वर्षीदेखील देवकीअम्मा सक्रिय आहेत. त्यांच्या कार्यासाठी यंदा त्यांना पद्मश्री पुरस्कारही जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय वनदिनानिमित्त (२१ मार्च) त्यांचा कार्यपरिचय करून देणारा हा लेख.
देवकीअम्मा केरळमधील अलप्पुळा जिल्ह्यातील मुथुकुल्ल्म गावात आपल्या पतीबरोबर राहत होत्या. सगळ्यांसारखे त्यांचेही आयुष्य अगदी सामान्य पद्धतीने व्यतीत होत होते. एके दिवशी एका भयंकर कार अपघातात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलले. त्या इतक्या गंभीर जखमी झाल्या होत्या, की त्यांना उठता-बसताही येत नव्हते. त्या शेतीची कामे, घरातील इतर कामे करू शकत नव्हत्या. ज्यांच्यासाठी घर, शेत हेच सारे जग होते, त्यांना आता यापुढे एकही काम करता येणार नाही, तर मग पुढे काय? जगायचे कशासाठी? आता असेच परावलंबी जीवन जगायचे, असा विचार करून त्या नैराश्यात गेल्या.
एक दिवस विचारांच्या अशा तंद्रीत असताना अचानक त्यांचे लक्ष घरामागे असलेल्या पडीक अंगणाकडे गेले. त्या कशा तरी चालत तिथपर्यंत पोहोचल्या. तिथे त्यांनी एक छोटेसे रोपटे लावले. त्या रोपट्याला पाणी घालताना त्यांना मनातून खूप समाधान वाटले. ते रोपटे जसजसे वाढू लागले, तसतसा देवकीअम्मांचा चेहरादेखील उजळू लागला. अचानक त्यांना त्यांच्या जगण्याचे कारण मिळाले. या एका रोपट्याने त्यांच्या मनात जगण्याची उमेद मिळाली. त्या रोज घरामागील अंगणात जाऊन रोपटी लावू लागल्या. त्यांची निगा राखू लागल्या. ती रोपटी हळूहळू मोठी होऊ लागली. हे सगळे करत असताना आजूबाजूची माणसे त्यांना नावे ठेवत होती, हसत होती. त्यांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले.
असे करता करता शेकडो झाडांची लागवड कधी झाली, हे त्यांनाही समजले नाही. दुसरीकडे त्यांची तब्येतही हळूहळू सुधारू लागली. अशा पद्धतीने एक एक झाड लावता लावता त्यांनी त्यांच्या कुटुंबाची मालकी असणाऱ्या पाच एकर जमिनीवर तपोवन फुलवले. देवकीअम्माच्या मेहनतीतून साकारलेला हा काही छोटा बगीचा नव्हता, तर ते मानवनिर्मित वन होते. आज या वनात तीन हजारांहून अधिक झाडे आहेत. त्यात आंबा, सागवान, फणस, चिंच, बांबू, महोगनी अशी विविध देशी प्रजातींची झाडे आहेत. एवढेच नाही तर केरळमधील कित्येक औषधी वनस्पती - ज्या आता लुप्त होत चालल्या आहेत, त्यासुद्धा अम्मांच्या या तपोवनात आहेत.
अम्मांनी फक्त झाडे लावलीच नाहीत तर त्यांना मुलांप्रमाणे प्रेम दिले. मायेने, वात्सल्याने वाढवले. त्या झाडांमध्ये अम्मा इतक्या एकरूप झाल्या आहेत, की त्यातील एखाद्या झाडाला नुसता हात लावला तरी ते झाड कधी लावले होते, त्या झाडाला काही रोग झाला आहे का, हे त्यांना समजते. त्यांनी अशा प्रकारे या भागात जैवविविधता विकसित केली आहे. त्या झाडांवर येणारे पक्षी, प्राणी, कीटक, साप, फुलपाखरे आदींच्या दुर्मीळ प्रजातीसुद्धा इथे बघायला मिळतात. एवढेच नाही, तर अम्मांनी फुलवलेल्या या जंगलामुळे तेथील जलपातळीतसुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे. विहिरींना बारा महिने पाणी असते, तळी भरलेली असतात.
केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या या कार्यासाठी पद्मश्री सन्मानही यंदा जाहीर झाला आहे. याआधी त्यांना महिला व बालविकास मंत्रालयाचा नारीशक्ती पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार आणि वनमित्र पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. माणूस शारीरिक व्याधींनी त्रस्त होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या हालचालींना मर्यादा येत असतील, परंतु जोपर्यंत तो मनाने खंबीर असतो तोपर्यंत कोणतेही संकट त्याला थांबवू शकत नाही, याचे उदाहरण म्हणजे देवकीअम्मा. या फॉरेस्ट मदरने अनेक झाडांची जननी होण्याचा मान मिळवला आहे. जी सर्व सजीवांना प्राणवायू देतात, अशा झाडांची ही जननी! स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल आणि अहोभाग्य म्हणतात ते हेच असेल, जे आज देवकीअम्माचे आहे... हजारो झाडांची जननी होण्याचे!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment