शिवजयंतीनिमित्त माहिती छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची...
छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व खूप मोठे होते. शिवाजी महाराज हे कर्तव्यदक्ष आणि आदर्श राजे होते. महाराजांनी गरीब-दुबळ्यांना मदत केली. तसेच प्रजेवर खूप माया केली. महाराजांचे कुटुंबावर, प्रजेवर खूप प्रेम होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली व जून १६७४मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. महाराजांनी मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना खूप व्यापक आणि प्रभावी होती. निर्विकार झालेल्या मराठी माणसाला त्यांच्या या कार्यामुळे चेतना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे सार्वभौम आणि सर्वसत्ताधारी राजे होते. ते उत्तम न्याय करायचे. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धत स्वीकारली. स्वराज्यातील राज्यकारभाराची निरनिराळी कामे महाराजांनी या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांकडे सुपूर्द केली. या अष्टप्रधान मंडळाची माहिती घेऊ या.
१. पंतप्रधान पेशवा : मोरोपंत त्रिंबक पिंगळे
हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील सर्वांत प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हे छत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी हाती सुवर्णकलश घेऊन पूर्व दिशेला उभे राहिले होते. छत्रपतींनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. सर्व राज्यकारभारावर मोरोपंत पिंगळे लक्ष ठेवून असत. छत्रपतींच्या गैरहजेरीत राजांचे प्रतिनिधी या नात्याने हे सर्व कारभार पाहत असत. यावरून या मुख्य पदाचे महत्त्व लक्षात येते.
२. पंत अमात्य मुजुमदार : रामचंद्र नीळकंठ
रामचंद्र नीळकंठ हे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री होते. छत्रपतींच्या राज्यभिषेकाच्या वेळी हे दही-दुधाने भरलेला तांब्याचा कलश घेऊन पश्चिम दिशेला उभे होते. रामचंद्र नीळकंठ हे स्वराज्यातील सर्व महाल आणि परगण्यांचा एकूण जमाखर्च व त्या त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो व्यवस्थित तपासून घेणे हे अमात्यांचे काम होते. तो लिहून, तपासून महाराजांसमोर सादर करायचे.
३. पंत सचिव सुरनीस : अण्णाजीपंत दत्तो
हेही एक महत्त्वाचे मंत्री होते. सर्व येणाऱ्या-जाणाऱ्या पत्रव्यवहारावर हे लक्ष ठेवायचे. छत्रपतींच्या राज्यभिषेकाच्या वेळी आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजीपंत दत्तो होते. छत्रपतींकडून वेगवेगळ्या सुभेदारांना व अधिकाऱ्यांना आज्ञापत्रे पाठवली जात असत. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी यांना त्यावर लक्ष ठेवावे लागत असे. तसेच स्वराज्याचे दफ्तर आणि जमीन महसूल व्यवहारांवर हे लक्ष ठेवत असत.
४. मंत्री वाकनीस : दत्ताजीपंत त्रिंबक
हे छत्रपतींच्या खासगी कामाकडे लक्ष ठेवत असत. रोजनिशी, भोजनव्यवस्था, वैयक्तिक संरक्षण यांवर यांचे लक्ष असायचे. तसेच खासगी कौटुंबिक आमंत्रण करण्याचे काम दत्ताजीपंत त्रिंबक हे करत असत.
५. सेनापती सरनोबत : नेताजी पालकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ आणि पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर यांची हुकूमत चालत असे. अर्थातच हे पद खूप महत्त्वाचे होते.
६. पंत सुमंत डबीर : रामचंद्र त्रिंबक
हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, तसेच प राष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे व परराष्ट्रांशी संबंधित माहिती नियमितपणे महाराजांना देणे, सल्ला देणे तसेच हेरांच्या मदतीने माहिती काढण्याचे जबाबदारीचे काम रामचंद्र त्रिंबक यांच्याकडे होते.
७. न्यायाधीश काझी-उल-ऊझत : निराजीपंत रावजी
हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. स्वराज्याच्या दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून, तसेच न्यायनिवाडा करून निराजीपंत रावजी हे रयतेला न्याय द्यायचे.
८. पंडितराव दानाध्यक्ष सद्र-मुहतसिव : मोरेश्वर पंडित
छत्रपतींच्या धर्मखात्याचे हे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान, तसेच ब्राह्मणांचा सन्मान करणे व यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबद्दल सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे इत्यादी काम मोरेश्वर पंडित पाहत असत.
प्रधान अमात्य सचिव मंत्री, सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री,
सेनापती त्यात असे सुजाणा, अष्टप्रधानी शिवमुख्य राणा ।।
छत्रपती शिवाजी महाराजांनी मंत्र्यांची नेमणूक करताना अत्यंत दक्षता घेतली होती. राज्यभिषेकाच्या वेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली होती. तसेच छत्रपतींनी आपल्या या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही मंत्रिपदे वंशपरंपरागत न ठेवता, कर्तृत्वावर ठरवण्यात यावीत, असे सांगितले होते. व्यक्तीचे गुणदोष बघून नेमणूक केली गेली होती.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment