अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा होतोय लाभ
नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना आणि उपकर्म राबवले जातात. उद्योजकांना अर्थसाह्य देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना राबवली जाते. नांदेडमधील आर्यवैश्य समाजातील पांडुरंग कवटिकवार यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांनी नुकतीच अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयाला भेट देऊन आपला सकारात्मक अनुभव व्यक्त केला. त्या वेळी त्यांनी समाधान व्यक्त करून अमृत संस्थेचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
अमृत संस्थेच्या या योजनेतून पांडुरंग कवटिकवार यांना आतापर्यंत एकूण एक लाख ११ हजार रुपयांचा व्याजपरतावा मिळाला असून, त्यामुळे त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या आर्थिक साह्यामुळे व्यवसायवाढीसाठी मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व पात्र उमेदवारांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. कवटिकवार यांनी केले. या वेळी त्यांनी अमृत संस्थेचे ओमकार शेटे आणि सौरभ कुलकर्णी यांचेही विशेष सहकार्याबद्दल आभार मानले.
अमृत संस्थेच्या या योजनेमुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून, संस्था समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रभावीपणे कार्यरत आहे.
अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता?
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment