प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांची २९ एप्रिल ही जयंती. त्या निमित्ताने त्यांचे हे अल्पचरित्र...
प्रभू रामचंद्र, कृष्ण, लक्ष्मी, सरस्वती, शंकर-पार्वती या हिंदू देवतांच्या मानवी रूपातील वास्तववादी पद्धतीने चित्रित केलेल्या प्रतिमा आपण आज प्रत्येक घरामध्ये पाहतो. देवादिकांची ही सुंदर रूपे चित्रित करणारे महान चित्रकार म्हणजे राजा रविवर्मा! भारतामध्ये युरोपीय वास्तववादी पद्धतीने व्यक्तिचित्रण करणारे ते पहिले भारतीय चित्रकार होते.
राजा रविवर्मा यांचा जन्म केरळ राज्यातील त्रिवेंद्रमपासून ४५ किलोमीटरवर असलेल्या किलीमानूरच्या राजप्रासादात २९ एप्रिल १८४८ रोजी झाला. त्यांची आई उमांबा ही राजघराण्यातील नृत्यनिपुण कलावती होती आणि वडील श्रीकांतन भट्टथिरीपाद हे संस्कृत पंडित होते. त्यांना आईकडून कलेचा व वडिलांकडून संस्कृत साहित्याचा वारसा लाभला. लहानपणापासूनच त्यांचा चित्रकलेकडे विलक्षण ओढा होता. त्यांना कलेचे प्राथमिक धडे व प्रोत्साहन त्यांचे काका राजा राजवर्मा यांनी दिले. त्यांनी रविवर्मांना वयाच्या चौदाव्या वर्षी त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आणले. त्या काळात भारतातील अनेक संस्थानिक पाश्चात्य चित्रकारांना पाचारण करून, त्यांच्याकडून आपली व्यक्त्तिचित्रे रंगवून घेत असत. इंग्रज चित्रकार थीओडोर जेन्सन यांना १८६८मध्ये त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आमंत्रित केले गेले होते. जेन्सन व राजदरबाराचे चित्रकार रामस्वामी नायडू या दोघांचाही रविवर्मा यांच्यावर प्रभाव पडला. थीओडोर जेन्सन यांनी हाताळलेले तैलरंग हे माध्यम त्या काळी भारतीय कलापरंपरेला नवीनच होते. तरुण रविवर्मांपुढे या माध्यमामुळे एक नवीन विश्वच उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी हे माध्यम आत्मसात करून, त्यात विलक्षण प्रभुत्व संपादन केले.
रविवर्मा यांनी आपल्या कलाजीवनाच्या सुरुवातीच्या काळात तंजावर शैलीत चित्रे रंगविली. रविवर्मा यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्य कलेतील वास्तववादी तंत्र व तैलरंगाचे माध्यम वापरून भारतीय महाकाव्यांतील प्रसंग आणि धार्मिक विषय रंगवले. या त्यांच्या तजेलदार व अभिनव आविष्कारामुळे त्यांना भारतीय तैलरंगचित्रणाचे आद्य जनक मानले जाते. पाश्चात्य चित्रतंत्रातील यथादर्शनाच्या साह्याने निर्माण होणारा, वातावरणाचा त्रिमितीय आभास त्यांनी आपल्या चित्रांतून परिणामकारकतेने दाखविला. त्यांच्या चित्रांचे विषय प्रामुख्याने लक्ष्मी, सरस्वती, कृष्ण, शिव-पार्वती, दत्तात्रेय, रामपंचायतन इत्यादी पौराणिक देवदेवता तसेच कृष्णशिष्टाई, विश्वामित्र-मेनका, शकुंतला-पत्रलेखन, हरिश्चंद्र-तारामती, नल-दमयंती, रावण-जटायू, मोहिनी-रुक्मांगद, श्रीकृष्ण-बलराम यांसारख्या रामायण, महाभारतादि महाकाव्यांच्या कथानकांतील पौराणिक व्यक्त्ती व घटना यांवर आधारित असत. विशेषतः लक्ष्मी, सरस्वती, शिव-पार्वती, रामपंचायतन, विश्वामित्र-मेनका, कृष्णशिष्टाई इत्यादी चित्रे त्या काळी घराघरांतून दर्शनी भागांत लावलेली दिसत.
राजेरजवाड्यांच्या व संस्थानिकांच्या महालांत अडकून पडलेली चित्रकला त्यांनी जनसामान्यांपर्यंत आणून पोहोचवली, असे म्हटले जाते. या चित्रांच्या असंख्य प्रती भारतभर व परदेशांतही फार लोकप्रिय झाल्या. रविवर्मा यांच्यावरील संस्कृत व मल्याळम् काव्यांचे संस्कार त्यांच्या चित्रांतून उमटलेले दिसतात. चित्रांत वापरलेली प्रतीके त्याची साक्ष देतात. रविवर्मा यांच्या कलेला जशी राजदरबारी प्रतिष्ठा मिळाली, तसाच जनसामान्यांकडूनही प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हैसूर आणि बडोदा या संस्थानांसाठी त्यांनी बरीच चित्रे काढली. बडोद्याचे दिवाण सर माधवराव यांच्या सल्ल्यावरून त्यांनी लोणावळ्यानजीक मळवली येथे तैलचित्र (ओलिओग्राफिक) छापखाना स्थापन केला आणि चित्रांच्या असंख्य प्रतिकृती तयार केल्या. पाश्चात्य तंत्रात चितारलेल्या व भारतीय वातावरण असलेल्या या चित्रांची विलक्षण मोहिनी तत्कालीन समाजावर होती. अमाप लोकप्रियतेबरोबरच त्यांना व्यावसायिक यशही मिळाले.
मद्रास येथे भरलेल्या प्रदर्शनात (१८७३) त्यांच्या शकुंतलापत्रलेखन (शकुंतलेचे दुष्यंत राजाला प्रेमपत्र) या चित्राला प्रथम पारितोषिक गव्हर्नरच्या सुवर्णपदकाच्या रूपात मिळाले. तेव्हापासून त्यांची कीर्तिशिखराकडे वाटचाल सुरू झाली. मद्रासचे गव्हर्नर बकिंगहॅमचे ड्यूक यांनी त्यांना बरीच कामे मिळवून दिली. १८७५मध्ये त्रिवेंद्रमला प्रिन्स ऑफ वेल्स आले असता रविवर्मांची चित्रे राजेसाहेबांनी त्यांना भेट म्हणून दिली. १८८० साली पुण्यात आणि १८९२मध्ये व्हिएन्ना व शिकागो येथील प्रदर्शनांत त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली व त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. कलेच्या क्षेत्रात राजा रविवर्मांना मिळालेली मान्यता, तसेच त्यांची प्रतिभा व कार्य बघून सातवे एडवर्ड यांनी त्यांना १९०४ साली ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक देऊन गौरव केला. त्यांनी काही व्यक्त्तिचित्रे व लोकजीवनावर आधारित चित्रेही काढली आहेत. त्यांनी केलेले डॉ. दादाभाई नवरोजी यांचे व्यक्तिचित्र प्रसिद्ध आहे. त्रावणकोरच्या अल्पवयीन राजपुत्राचे पालकत्व त्यांच्याकडे आले असता, ते न पत्करता त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत निष्ठेने चित्रे रंगविली. किलीमानूर येथे त्यांचे २ ऑक्टोबर १९०६ रोजी निधन झाले. रणजित देसाई यांनी त्यांच्या जीवनावर राजा रविवर्मा ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे.
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment