भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या (३० एप्रिल) जयंतीनिमित्त त्यांचा अल्प परिचय...
भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार दादासाहेब फाळके चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके; पण ते दादासाहेब या नावानेच अधिक प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ३० एप्रिल १८७० रोजी झाला. त्यांचे वडील दाजीशास्त्री स्वत: संस्कृत भाषेचे विद्वान आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे दादासाहेबांचे बालपण धार्मिक वातावरणात गेले. दादासाहेब १२ वर्षांचे असताना दाजीशास्त्रींनी मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेज येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि फाळके कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले.
दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मुंबईतील मराठा हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८८५मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १८९० साली त्यांनी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाभवनातून त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि मॉडेलिंग (चित्रकला) यामध्ये प्रावीण्य मिळवले. याचबरोबर त्यांनी छायाचित्रण, फोटोलिथोग्राफी या व्यावसायिक कलांचेही शिक्षण घेतले. त्यात विविध प्रयोगही केले. अहमदाबाद येथील १८९२मधील औद्योगिक प्रदर्शनात त्यांच्या आदर्श गृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले. १८९५मध्ये त्यांनी गुजरातमधील गोध्रा येथे व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला; पण तेथे त्यांचा जम बसला नाही. १९०० साली ते बडोद्याला परतले; पण त्यांच्यातला हरहुन्नरी कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी एका जर्मन जादूगाराकडून जादूची कला शिकून प्रोफेसर केळफा (केल्फा) या नावाने जादूचे प्रयोग दाखवायला सुरुवात केली. हे प्रयोग त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले.
दादासाहेबांनी १९०३ रोजी भारतीय पुरातत्त्व खात्यात प्रारूपकार आणि छायाचित्रकार म्हणून नोकरी पत्करली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली; पण स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या वंगभंग चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि चळवळीला साथ देऊन १९०६ साली त्यांनी ही सरकारी नोकरी सोडून दिली. १९०८मध्ये त्यांनी लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था सुरू केली. पुढे ती दादरला हलवली. तिचे रूपांतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’मध्ये झाले. १९०९मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली; पण व्यवसायातील भागीदारांबरोबर बेबनाव झाल्यामुळे ते १९११मध्ये वेगळे झाले. यामुळे दादासाहेब उद्विग्न होते.
याचदरम्यान त्यांनी मुंबईमध्ये लाइफ ऑफ जिझस ख्राइस्ट (ख्रिस्ताचे जीवन) हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले. स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने त्यांना झपाटून टाकले. भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनावरही असाच चित्रपट बनवायचा ध्यास घेऊन अथक प्रयत्नांनी त्यांनी लंडनला जाऊन चित्रपटविषयक तांत्रिक ज्ञान मिळवले. तेथे आवश्यक यंत्रसामग्री आणि कच्चा माल मागवण्यासाठी नोंदणीही केली व एक एप्रिल १९१२ रोजी ते भारतात परतले. तेथील वास्तव्यात प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सर्व सामग्री मे महिन्यामध्ये हाताशी आल्यावर प्रयोगादाखल जून-जुलैमध्ये 'रोपट्याची वाढ' हा एका मिनिटाचा लघुपट त्यांनी तयार केला आणि काही निवडक व्यक्तींना दाखवला. त्याचा योग्य परिणाम वाटल्याने पत्नीचे दागदागिने गहाण ठेवून भांडवल उभे करून लवकरच मुंबईत दादर येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली. सहा महिन्यांत म्हणजे ३ मे १९१३ रोजी मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय बनावटीचा चित्रपट प्रदर्शित झाला. तो मूकपट होता. 'राजा हरिश्चंद्र'च्या यशाने खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक व्यवसाय म्हणून पाया रचला गेला. या चित्रपटाकरिता लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, संकलनकार, रसायनकार अशा सर्व भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या.
या चित्रपटांनंतर त्यांनी मोहिनी भस्मासूर (१९१३ ), सत्यवान सावित्री (१९१४) या चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनाही चांगले व्यावसायिक यश लाभले. त्यांनी १९१४ मध्ये पुन्हा इंग्लंडला प्रयाण केले. या वास्तव्यात त्यांनी निर्मिती केलेले चित्रपटही तेथील निर्मात्यांना दाखवले. या चित्रपटांतील तांत्रिक अंगांचे परदेशातही खूप कौतुक झाले. इंग्लंडहून परतल्यावर पुढील दोन वर्षांत दादासाहेबांनी आगकाड्यांची मौज, नाशिक-त्र्यंबक येथील देखावे, तळेगाव काचकारखाना, केल्फाच्या जादू, लक्ष्मीचा गालिचा, धूम्रपान लीला, सिंहस्थ पर्वणी, चित्रपट कसा तयार करतात, कार्तिक-पूर्णिमा उत्सव, धांदल भटजीचे गंगास्नान, संलग्न रस, स्वप्नविहार हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट तयार केले. त्यामुळे अनुबोधपटांच्या जनकत्वाचा मानही त्यांच्याकडेच जातो.
१९१७मध्ये त्यांनी लंकादहन हा चित्रपट प्रदर्शित केला. त्या चित्रपटाने उत्पन्नाचे त्यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले. दादासाहेबांची चित्रपटनिर्मितीसाठीची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला व शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक साह्याने पाच लाख रुपये भांडवल उभे करून ‘फाळकेज फिल्म लिमिटेड’ ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली. परंतु ती कार्यान्वित झाली नाही. कोहिनूर मिल्सचे वामन आपटे, माया भट्ट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत एक जानेवारी १९१८ रोजी ‘फाळकेज फिल्म्स’चे रूपांतर त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’मध्ये केले. त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत १९१४ पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितीगृहही त्यांनी नाशिक येथे उभारले. या संस्थेद्वारे दादासाहेबांनी दिग्दर्शन केलेले श्रीकृष्णजन्म (१९१८) व कालियामर्दन (१९१९) हे दोन्ही चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले; परंतु या चित्रपटानंतर त्यांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. म्हणून मन:शांतीसाठी ते १९१९अखेर सहकुटुंब काशीला निघून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी 'रंगभूमी' हे नाटक लिहून त्याची निर्मिती केली; पण त्याला व्यावसायिक यश मिळाले नाही. १९२२मध्ये ते कंपनीत परतले. १९३४पर्यंत हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण ९७ चित्रपट काढले. त्यांत फाळके यांनी दिग्दर्शन केलेले ४० चित्रपट होते. त्यांनी या कंपनीकडून दिग्दर्शित केलेला १९३१मधला 'सेतुबंधन' हा शेवटचा चित्रपट होय. आयुष्याच्या अखेरीला त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. तरीही त्याही अवस्थेत वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी कोल्हापूर सिनेटोनसाठी 'गंगावतरण' (१९३७) हा त्यांचा पहिला आणि शेवटचा बोलपट निर्माण केला आणि निवृत्ती स्वीकारली.
आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी एकूण ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली. आर्थिक विवंचनेतच वयाच्या ७४व्या वर्षी त्यांचे नाशिक येथे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून म्हणजे १९६९पासून भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. याचे स्वरूप दहा लाख रुपये आणि सुवर्णकमळ असे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारतीय टपाल खात्यानेही दादासाहेबांच्या सन्मानार्थ १९७१ साली त्यांचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण केले. मुंबई येथील चित्रनगरी (फिल्मसिटी) आता दादासाहेब फाळके चित्रनगरी या नावाने ओळखली जाते.
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment