थोर गायक आणि कलाकार वसंतराव देशपांडे यांच्या (दोन मे) जयंतीनिमित्त त्यांचा अल्प परिचय...
संगीतामध्ये सतत नावीन्याचा शोध घेऊन आणि आपली कला वेगळेपणाने जोपासत राहून संगीतातील व संगीत रंगभूमीवरील कारकीर्द गाजविणारे प्रसिद्ध कलाकार म्हणजे वसंतराव देशपांडे. वसंतराव यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे २ मे १९२० रोजी झाला. त्यांचे वडील बाळकृष्णबुवा हे तबलावादक, तर आजोबा गोविंदराव हे गायक होते. वसंतरावांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आई राधाबाई या नागपूरला आल्या. त्या शिक्षिका होत्या. त्यांनाही गायन, नाटक इत्यादींची आवड होती. ते बाळकडू वसंतरावांनाही मिळाले. वसंतरावांच्या शैक्षणिक कारकीर्दीला नागपूरमध्ये सुरुवात झाली. संगीताच्या प्रारंभिक शिक्षणासाठी वयाच्या सातव्या वर्षी ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयात दाखल झाले. गाणे शिकता शिकता ते तबलाही वाजवायला शिकले. लहानग्या वसंतरावांनी १९३१ साली कोल्हापूर सिनेटोनच्या कालियामर्दन या चित्रपटात कृष्णाची भूमिका केली आणि ती खूप गाजली. कोल्हापूरच्या वास्तव्यात त्यांना उस्ताद अल्लादियाखाँ, भूर्जीखाँ, घम्मनखाँ, शंकरराव सरनाईक, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या संगीतातील दिग्गजांचा सहवास लाभला.
वसंतरावांचे एक मामा दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत संगीत मंडळीत होते आणि ते वसंतरावांना नाटकांना बरोबर घेऊन जात असत. त्यातूनच त्यांना नाट्यसंगीताची आवड निर्माण झाली. त्यांचे नाट्यप्रेम आणि आवाज पाहून दीनानाथांनी वसंतरावांना काही नाट्यगीते स्वत: शिकविली. त्यानंतर वसंतराव लाहोरला त्यांच्या दुसऱ्या मामांकडे शिकण्यासाठी राहिले. तेथे त्यांनी असद अली खाँ (पतियाळा घराणे) यांच्याकडून मारवा रागाची तालीम घेतली. सुरेशबाबू माने (किराणा घराणे), अमानत अली खाँ (भेंडीबाजार घराणे), कुमार गंधर्व (ग्वाल्हेर घराणे) आणि रामकृष्णबुवा वझे (ग्वाल्हेर घराणे) अशा संगीत दिग्गजांकडून ते अनेक घराण्यांची गायकी शिकले आणि यामधून स्वत:ची अशी वेगळी शैली त्यांनी निर्माण केली. ‘माझे घराणे माझ्यापासूनच सुरू होते’ असे ते सार्थ अभिमानाने म्हणत असत. संगीतामधील नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्या आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. उत्तम गळा, चौफेर नजर, खेळकर स्वभाव आदी कारणामुळे त्यांचे गायन रसिकांच्या पसंतीस उतरे. महाराष्ट्रातील रूढ गायकीतील बारकावे घेत असतानाच ते पंजाबी बाजाच्या हरकतीदेखील सहजतेने घेत. त्यांची गायकी लयदार, तडफदार, आक्रमक होतीच; पण प्रसंगी ती मृदू आणि भावूक देखील होत असे. ते तबला उत्तम वाजवीत, त्यामुळे तो रंग देखील ते छान जमवीत. रागदारी संगीताबरोबरीनेच ते ठुमरी, गझल, टप्पा, भजन, अभंग, चित्रपटगीते, लावणी असे विविध प्रकार मनापासून गात. संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिकादेखील त्यांनी गायन आणि बहारदार अभिनयाने गाजवल्या. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकामधील खाँसाहेब ही व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयाने प्रसिद्ध झाली. चरितार्थासाठी त्यांनी बराच काळ पुण्याच्या सैनिकी खात्यात नोकरी केली; पण १९६५ साली त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ ते गाण्यामध्येच रमले. काही मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. तसेच अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले. त्यातील अनेक गाणी अतिशय गाजली.
मराठी नाट्यविश्वात प्रसिद्ध असलेल्या ‘रंगायन’ या संस्थेमध्ये नंतरच्या काळात त्यांचाही सहभाग होता. १९६२मध्ये त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य (डॉक्टरेट) ही पदवी मिळवली. १९८३मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे ३० जुलै १९८३ रोजी पुणे येथे निधन झाले. वसंतरावांच्या स्मृतीनिमित्त नागपुरात सिव्हिल लाइन भागात त्यांच्या नावाने भव्य, आकर्षक अशा वसंतराव देशपांडे सभागृहाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन ते चार दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव सुरू करण्यात आला आहे. अशा या थोर गायकाला आणि कलाकाराला शतश: नमन!
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment