ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जागवलेल्या आठवणी

वयाची ९५ वर्षे पूर्ण; या वयातही हात आहे लिहिता...

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जागवलेल्या आठवणी मुख्य फोटो
मुख्य फोटो

आपल्या लेखणीतून उतरलेल्या ९० पुस्तकांमधून कोकणाच्या लाल मातीचे विविधांगी दर्शन घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी वयाची ९५ वर्षे पूर्ण केली. या वयातही त्यांचा हात लिहिता आहे. त्या निमित्ताने, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) यांच्यातर्फे रत्नागिरीत त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. त्या वेळी त्यांची प्रकट मुलाखतही झाली होती. त्या वेळी मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केलेल्या या काही भावना -

बालपणी कोणीही मोठा मार्गदर्शक नव्हता. माझे बालपण कोकणातील खेड्यापाड्यात गेले; मात्र लहानपणी साने गुरुजींनी माझ्या शाळेला दिलेली भेट माझ्यात बदल घडवणारी ठरली. आयुष्यातील पहिला लेखक मी पाहिला होता. त्यांनी सांगितलेल्या आईच्या गोष्टीमध्ये मला माझी आई दिसत होती. याच त्यांच्या अगदी अल्पशा सहवासाने माझ्यामध्ये साहित्याची बीजे रोवली गेली.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा केवळ दोन मते कोकणात असल्याचे समोर आले. त्यामुळे अनेकांनी 'तुम्हाला कोण निवडून देणार' असा प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी कुसुमाग्रज यांनी पहिला आशीर्वाद दिला. यानंतर पु. ल. देशपांडे यांनी समर्थन असल्याचे जाहीर केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आशीर्वाद दिले. यामुळे विजय सुकर झाला. कोकणात केवळ दोन मते असताना माझा विजय होणे हा चमत्कारच होता. कोकणात थोर विचारवंत, लेखक, पत्रकार होऊन गेले. साहित्याचा मोठा वारसा कोकणाला लाभला आहे; मात्र मी निवडणूक लढलो, तेव्हा केवळ दोन मते कोकणात असल्याची खंत मनामध्ये होती. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातल्या लेखकांसाठी असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेसारखी संघटना असावी असा विचार मनामध्ये आला. त्यातूनच कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली.

कवी केशवसुत यांच्या कविता शालेय अभ्यासक्रमात असल्याने गणपतीपुळे येथे आलो, तेव्हा मालगुंड येथील कवी केशवसुत यांच्या घराला भेट दिली. अतिशय दुरवस्थेत असलेले घर पाहून मन हेलावून गेले. त्यानंतर मी लंडन येथे गेलो असता त्या ठिकाणी शेक्सपिअरचे घर पाहिले. सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे त्याचे घर इंग्रजांनी जतन करून ठेवले आहे. त्यांच्या वस्तूदेखील त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. हे सर्व पाहून मी भारावून गेलो. यातून कवी केशवसुत यांचे घर असलेले ठिकाण स्मारक स्मारक करावे, अशी प्रेरणा मिळाली. राज्यातील काही लेखकांची टीम घेऊन रत्नागिरीत आलो. त्यांना केशवसुत यांचे घर दाखवले. यातून काही पैसे गोळा करून स्मारकाचे भूमिपूजन केले. आज उभे राहिलेले स्मारक हे लोकांच्या पुढाकारातून झाले आहे.

माजी खासदार बॅ. नाथ पै यांच्या स्वभावात एक विलक्षण गोडवा होता. समाजवादी विचारांशी अतिशय ठाम असे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा मला सहवास लाभला हे माझे भाग्यच होते. मालवणात १९६२ साली झालेल्या वादळावेळी मालवणात जात असताना आम्हाला भूक लागल्याने आम्ही कट्टा येथे वाटेत थांबलो. नाथ पै एका घरामध्ये गेले असता घरातील वृद्ध महिलेने आम्हाला पेज बनवून दिली. आम्ही सर्वांनी ती आवडीने घेतली. लोकांचे अशा प्रकारे प्रेम मिळवणारा त्यांच्यासारखा नेता पाहिला नाही. लोकांविषयी आस्था, कणव असणे ही मला नाथ पै यांच्याकडून मिळालेली देणगी आहे.

प्रत्येकाने आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहणे गरजेचे आहे. जे काही मिळवले त्यात मी अतिशय समाधानी आहे. व्यक्तिगत जीवनात मला अपयश आले नाही. सार्वजनिक जीवनात काही ठिकाणी अपयश आले; मात्र या अपयशातूनच मी यशाकडे गेलोय. अनेक मुलांना पदवीधर करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामुळे आयुष्यामध्ये मी समाधानी आहे.

१९५१मध्ये मी शिक्षणासाठी रत्नागिरीत आलो होतो. त्यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग एकच जिल्हा होता. शिक्षणाच्या फार सोयी नव्हत्या. याच रत्नागिरीमधून मी मॅट्रिक झालो. दीनानाथ वाघदरे यांनी माझी पहिली कथा प्रसिद्ध केली होती. ही प्रसिद्ध झालेली कथा मी आईला दाखवली होती, त्या वेळी तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. 'बाळा तू खूप मोठा लेखक हो' असा आशीर्वाद आईने दिला होता. रत्नागिरीतच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळाले. त्यामुळे रत्नागिरी शहराशी माझे ऋणानुबंध खूप जुने आहेत. या आठवणी आजही माझ्यासमोर येतात.

अन्य प्रांतांतील साहित्यिक अस्मिता धारदार असल्या, तरी कोकणच्या साहित्यिक अस्मिता सुईसारख्या टोकदार आहेत. सुई शिवण्याचे काम करते, तसेच आम्ही कोकणी लोक सांधण्याचे काम करतो. कोणाचा दुस्वास करत नाही. साहित्य म्हणजे सहत्व. माणसे एकत्र येण्यातून तयार होते ममत्व आणि त्यातून होते विराट समाजाचे एकत्व. समाज एकात्म समाज एकात्म झाला, की त्यातून 'सत्यम शिवम सुंदरम्'चे दर्शन घडते. साहित्यासह संगीत, नृत्य, नाट्य या कला हेच सांगतात. प्रादेशिक अस्मिता असणे पाप नाही; पण सगळ्यांनी महाराष्ट्र एक आहे हे लक्षात ठेवून वागले, तर वेगळेपणाचे विचार मनात येणार नाहीत.

माझ्या पुस्तकांवर वाचकांनी भरभरून प्रेम केले; मात्र कोकण मराठी साहित्य परिषद आणि मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर आहेत. वाचकांनी यापुढे ती सांभाळावीत.

मराठी भाषेकडे लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. आजची पुस्तके, प्रसारमाध्यमांवरील कार्यक्रम पाहिले की भाषेबद्दल एक चिंता निर्माण होते. दहावीपर्यंतचे सक्तीचे शिक्षण अथवा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी एवढ्यावरच आपण थांबता कामा नये. प्रमाण भाषेच्या विकासासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे शुद्धीकरण ही आता काळाची गरज आहे.



Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 02:58 PM News publication time | Views: 513 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 02:58 PM News publication time | Views: 513 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement