जनगणनेमध्ये पहिल्यांदाच होतेय डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना
२०२७चा जनगणना उपक्रम सुरू झाला असून, देशात प्रथमच माहितीचे संकलन डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे. त्यामध्ये स्व-गणना हादेखील एक पर्याय असेल. महाराष्ट्र राज्यासाठी, घर-यादी आणि गृहगणनेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी स्व-गणना करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, तो एक मे २०२६ ते १५ मे २०२६ असा आहे. महाराष्ट्रदिनी विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी स्व-गणना करून या उपक्रमाचा प्रारंभ केला.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रति असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पद्धत सुरू करण्यात आली असून, त्या माध्यमातून नागरिकांना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईल आणि सादर करता येईल.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी याबद्दल माहिती दिली. भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक खास वेब पोर्टल विकसित केले असून, हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. त्याची लिंक अशी आहे - https://se.census.gov.in
कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे १५-२० मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो. अर्ज यशस्वीरीत्या सादर केल्यावर, एक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडी) तयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
स्व-गणना करणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. जर कोणी स्व-गणना केली नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही; माहिती गोळा करण्यासाठी/नोंदवण्यासाठी प्रगणक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रत्येक घरी भेट देणार आहेत.
स्व-गणना पर्यायांतर्गत नागरिक त्यांची माहिती स्वतःच ऑनलाइन स्वरूपात https://se.census.gov.in येथे भरू शकतील. स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक एसई आयडी येईल. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा गणनाकार घरोघरी भेट देतील, तेव्हा हा एसई आयडी त्यांना देणे आवश्यक आहे. गणनाकाराकडून एसई डेटाची पडताळणी/मान्यता झाल्यानंतरच घर-यादी आणि गृहगणनेसाठीची गणना पूर्ण मानली जाईल.
‘घर-यादी आणि गृहगणना’ या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रगणक घरी भेट देतील त्या वेळी स्व-गणना डेटाची पडताळणी, पुष्टीकरण आणि तो अंतिमतः सादर करण्यासाठी एसई आयडी देणे आवश्यक असेल. स्व-गणना पोर्टलद्वारे सादर केलेला सर्व डेटा एन्क्रिप्ट केला जातो आणि कडक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजनांसह सुरक्षित सरकारी सर्व्हरमध्ये संग्रहित केला जातो. प्रत्येकाने योग्य यूआरएल म्हणजेच https://se.census.gov.in येथे भेट देत असल्याची खात्री करावी आणि एसएमएस/ई-मेल संवादांची सत्यता पडताळून पाहावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
एसएमएस /ओटीपी द्वारे प्राप्त झालेल्या जनगणनेशी संबंधित सर्व संदेशांमध्ये प्रेषकाच्या नावात RGICEN हा कीवर्ड असतो, उदा. AD-RGICEN-S, BD-RGICEN-S, RGICEN-G, JK-RGICEN-G इत्यादी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment