बोधकथा - ४१
एकदा तीन मित्र जंगलातून जात होते. गप्पा मारत ते पुढे चालले होते. अचानक समोरून एक भयंकर वाघ आला. वाघाला पाहताच पहिला मित्र घाबरून ओरडला, “अरे, आता आपलं काही खरं नाही! आपण संपलो!”
दुसरा मित्र लगेच म्हणाला, “असं का म्हणतोस? देव आहे ना आपल्या रक्षणासाठी! चला, आपण देवाची प्रार्थना करू या.”
तिसरा मित्र शांतपणे म्हणाला, “नाही. अशा छोट्या गोष्टीसाठी देवाला त्रास कशाला द्यायचा? चला, पटकन त्या झाडावर चढू या.”
पहिला मित्र पूर्ण घाबरला होता. त्याला देवावर विश्वासच नव्हता. संकट आलं की सगळं संपलं, असंच त्याला वाटत होतं.
दुसरा मित्र ज्ञानी होता. त्याला माहीत होतं, की देवच या सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि रक्षणकर्ता आहे. म्हणून संकटाच्या वेळी त्याने देवाची आठवण काढली; पण तिसऱ्या मित्राच्या मनात देवाविषयी असलेलं प्रेम काही वेगळंच प्रेम होतं. त्याचं देवावर इतकं अपार प्रेम होतं, की त्याला वाटलं, “आपल्या छोट्याशा संकटासाठी देवाला कशाला त्रास द्यायचा?”
खरं प्रेम असंच असतं. त्या प्रेमात माणूस स्वतःपेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीची जास्त काळजी करतो. आपल्या प्रियजनांना अगदी छोटासाही त्रास होऊ नये, अशीच त्याची सतत इच्छा असते. हीच खरी भक्ती आणि प्रेमाची ओळख आहे.
(रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलेली गोष्ट)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment