अमृत संस्थेच्या योजना लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा उपक्रम
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणावेळी अमृत संस्थेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांना आलेले काही निवडक अनुभव....
मी जळगाव तालुक्यापासून घर सर्वेक्षण सुरू केले. विटनेर या गावात मराठा, भिल्ल, कोळी अशा अनेक जातींचे नागरिक राहतात. गावाच्या सरपंच नेहा साठे आहेत. या गावात अमृत संस्थेच्या लक्ष्यित समाजात येणारे जगदीश कुलकर्णी (५३ वर्षे) हे पत्नी, दोन मुले आणि मुलगी या आपल्या परिवारासह राहतात. जगदीश कुलकर्णी पौरोहित्य (पूजापाठ) करतात. परंतु गाव लोकसंख्येच्या दृष्टीने फार मोठे नसल्याने त्यांना चरितार्थ चालवण्याएवढे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांची पत्नी शेतात काम करून चरितार्थाला हातभार लावते. मुले शाळेत जातात. हे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगते. यांना राहण्यासाठी चांगले घरही नाही. ते उभारण्यासाठी त्यांना गावाने घरकुलही मंजूर करून दिलेले नाही, असे त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आढळून आले. त्या वेळी ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत वासुदेव चौधरी यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयात भेटही घेतली. कुलकर्णी परिवाराची पाहिलेली परिस्थिती त्यांना सांगितली. ग्रामपंचायतीच्या पुढील सर्वसाधारण सभेत कुलकर्णी यांना घरकुल मंजूर करून देऊ असे तोंडी आश्वासन दिले. त्या वेळी त्या बेघर वस्तीतील भिल्ल समाज, कोळी समाजाचे नागरिकही हजर होते; मात्र हे तोंडी आश्वासन पुरेसे नसून मी जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित कुटुंबाची त्यांच्याशी गाठ घालून देणार आहे. मी ब्राह्मण समाजाच्या ब्रह्मश्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ आणि लक्ष्यित समाजातील इतर मंडळांशी या कुटुंबाबाबत चर्चा केली. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष गावाला भेट देऊन कुटुंबाची चौकशी केली. लक्ष्यित समाजातील उद्योजक श्री. बोरकर यांनी या कुटुंबाची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली. त्यांना त्यांच्या कंपनीत नोकरी देण्याचे ठरवले. त्या माध्यमातून मुलांचे शिक्षणही होऊ शकते. त्यांनी घरही देण्याचे आश्वासन दिले.
दुसरा अनुभव जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावात आला. हे गाव जळगावपासून साधारणतः २० किलोमीटर अंतरावर आहे. या गावात सुभाष अत्रे (७५ वर्षे) आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे पुत्र अशोक (४९ वर्षे), सूनबाई आणि दोन व तीन वर्षे वयाची दोन नातवंडे असे हे कुटुंब आहे. या गावातही संमिश्र वस्ती असून, ब्राह्मण समाजाची बऱ्यापैकी घरे आढळून आली. सुभाष अत्रे वृद्ध असून, त्यांचे पुत्र शारीरिक दुर्बलतेने ग्रस्त आहेत. सूनबाईंची पार्श्वभूमी शैक्षणिक नसावी. राहते घर मातीचे असून, पूर्ण घर गळते. घरात विजेची पुरेशी साधनेही दिसली नाहीत. घरातील कर्ता पुरुष आजाराने ग्रस्त असल्याने तो काम करू शकत नाही. त्यामुळे या कुटुंबाचे जगणे खूपच कष्टाचे वाटले. या कुटुंबाच्या बाबतीतही जळगावचे जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी आणि ब्राह्मण समाजाचे प्रमुख यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वेक्षणात लक्ष्यित समाजाच्या म्हणजेच प्रामुख्याने ब्राह्मण समाजाच्या घरांमध्ये मुलांच्या लग्नाची समस्या फार मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळून आले. लक्षित समाजाच्या घरातील कुटुंबप्रमुखाने भेटीवेळी अगोदर 'कुठे मुली आहेत का' अशीच चौकशी केली. मुलांच्या वयाची ३५ वर्षे उलटूनही लग्न न झालेले किती तरी जण असल्याचे आढळले.
संस्थेच्या लक्ष्यित गटात येणाऱ्या सर्व समाजांच्या तुलनेत ब्राह्मण समाजाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक असल्याचे दिसून आले. त्यांना अमृत संस्थेच्या योजनांतर्गत लहान-मोठे व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करावे लागेल. बँकेने काही अटी-शर्ती कमी/शिथिल केल्या, तर ते व्यवसाय करण्यास उद्युक्त होतील, असे माझे मत मी निरीक्षणाआधारे नोंदवत आहे. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती त्यांना दिली. त्या माध्यमातून व्यवसाय थाटण्यासाठी बँकेकडून छोटे-मोठे कर्ज घेऊन लघुउद्योग स्थापन करावा आणि त्याचे दोन वर्षांचे व्याज शासन भरणार, असे सुचवूनही 'आम्हाला कर्ज नको. आमची जी दररोजची वाटचाल आहे त्यातच आम्ही समाधानी आहोत,' अशी भावना ब्राह्मण समाजाकडून व्यक्त झाली.
सर्वेक्षण करताना रेशन कार्डाबाबतची माहितीही लक्ष्यित समाजाला दिली. त्याकामी काही मदत लागली तर संबंधित शासकीय व्यवस्थेशी संपर्क साधून त्यांना मदत करणार आहे असेही आश्वासन दिले. या कुटुंब सर्वेक्षण उपक्रमांतर्गत दोन तरुणांना जळगाव येथील औद्योगिक वसाहतीत नोकरी मिळण्यासाठी मी साह्य केले.
(जळगाव जिल्हा व्यवस्थापक, अमृत)
Comments 1 Comments
DIPAK GUPTA
सर्वेक्षण केल्यामुळे ग्रामीण भागातील लक्षित गटातील समाजापर्यंत पोहचता आले व त्यांच्या व्यथा, समस्या समजुन घेता आल्या.
Write a Comment