एका छोट्या प्रयत्नातून मिळाले मोठे समाधान!

अमृत परिवार सर्वेक्षणावेळी आलेला हृदयस्पर्शी अनुभव

एका छोट्या प्रयत्नातून मिळाले मोठे समाधान! मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील सर्वेक्षणावेळी आलेला हा एक हृदयस्पर्शी अनुभव....

टिळकनगर येथे घोटकर कुटुंबातील एका आजींची भेट झाली. संवाद साधताना समजले, की त्या पूर्वी घाटकोपर येथे राहत होत्या आजोबा वारल्यानंतर चार-पाच वर्षांपूर्वी त्या डोंबिवली येथे स्थलांतरित झाल्या होत्या; मात्र त्यांचे रेशन कार्डचे ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया अजूनही झाली नव्हती. कुटुंबात आजी आणि त्यांचा मुलगा एवढेच सदस्य आहेत. मुलाकडे उत्पन्नाचे स्थिर साधन नसल्यामुळे तोही नैराश्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याचे लग्नही झालेले नाही. आजींनी अगदी डोळ्यांत पाणी आणून मला सांगितले, की त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करणे आवश्यक आहे; मात्र आर्थिक अडचणींमुळे ते शक्य होत नाही. म्हणून आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड काढायचे आहे; पण रेशन कार्ड ट्रान्स्फर न झाल्यामुळे ते शक्य होत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही मदत मिळेल का, असे त्यांनी मला विचारले.

मी आजींना होकार दिला. त्यांची सर्व कागदपत्रे घेतली आणि आरसीएमएस पोर्टलवर अपलोड केली. त्याची प्रत रेशन ऑफिसला जमा केली. एरिया ऑफिसर यांच्याशी संपर्क साधला आणि मंजुरीसाठी त्यांना विनंती केली. त्यांनीही छान सहकार्य केले. या सर्व प्रक्रियेत आजी मला दिवसातून तीन ते चार वेळा कॉल करून रेशन कार्डची चौकशी करत असत. आता तर त्यांच्याशी चांगले स्नेहबंध निर्माण झाले असून, माझी चौकशी करण्यासाठीही त्या कॉल करतात.

समाजातील अनेक कुटुंबांना एकाच वेळी आरोग्यविषयक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा वेळी योग्य मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती देणे किती आवश्यक आहे, हेही प्रकर्षाने जाणवले. अमृत या संस्थेमुळे असे अनुभव घेण्याची आणि कोणाच्या तरी आयुष्यात छोटासा बदल घडवण्याची संधी मिळाली. यातून मिळालेले समाधान शब्दांत मांडता येण्यासारखे नाही.

ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक 

Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 01:14 PM News publication time | Views: 922 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news
Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 01:14 PM News publication time | Views: 922 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement