राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाविषयी (११ मे) माहिती...
भारतात दर वर्षी ११ मे या दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचा विज्ञानातील विकास आणि तंत्रज्ञानातील कार्यक्षमता दर्शवतो. तसेच, या खास दिवशी देश आपल्या वैज्ञानिकांच्या अमूल्य कामगिरीचेदेखील स्मरण करतो. दर वर्षी ११ मे रोजी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन पाळला जातो. याशिवाय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे वेगवेगळ्या विभागातंर्गत कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले जाते. हा दिवस तांत्रिक सर्जनशीलता, वैज्ञानिक प्रगती, उद्योग व विज्ञानासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो. भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांमध्ये देशांतर्गत तांत्रिक क्षमतेच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी भारतात उत्पादित झालेल्या 'हंस-३' या देशातील पहिल्या एअरक्राफ्टने उड्डाण परीक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. भारतात तयार झालेल्या त्रिशूल क्षेपणास्त्राची या दिवशी यशस्वी चाचणी पार पडली होती.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाची सुरुवात १९९८मध्ये करण्यात आलेल्या पोखरण अणुचाचणीपासून झाली. ११ मे १९९८ रोजी राजस्थानमधील पोखरणमध्ये भारताने 'ऑपरेशन शक्ती'अंतर्गत तीन यशस्वी अण्वस्त्र चाचण्या घेतल्या. या चाचण्या तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. त्यानंतर भारत अण्वस्त्रसज्ज देश बनला. ही आण्विक चाचणी पोखरण (राजस्थान) येथे पार पडली होती. या दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कारदेखील प्रदान करतात. हा पुरस्कार या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
जाणून घेऊ या या पोखरण अणुचाचणीची रोमांचक कहाणी
११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानच्या पोखरणमध्ये अणुचाचणी करून जगाला धक्का दिला होता. अचानक झालेल्या या अणुचाचण्यांमुळे अमेरिका, चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण जगाला हादरा बसला होता. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली हे मिशन अशा प्रकारे पार पडले, की जगाला त्याची कल्पनाही नव्हती. ११ मे १९९८ रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या अणुस्फोट चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. ११ मेच्या दुपारी ३.४५च्या सुमारास तीन त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणुस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या. भारत अणवस्त्रसंपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला. त्या वेळी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए भारताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होती. अमेरिकन सॅटेलाइट्सचे पोखरण रेंजवर लक्ष होते; पण भारतीय वैज्ञानिकांनी या अमेरिकन सॅटेलाइटला चकवा देऊन ही चाचणी यशस्वी करून दाखवली. या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले वैज्ञानिक कोड भाषेमध्ये परस्परांशी बोलायचे. नेमके काय चालू आहे हे कोणालाही कळू नये यासाठी वैज्ञानिक सैनिकी गणवेश घालून पोखरण रेंजवर जायचे. या चाचणीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीचा सामना करावा लागणार होता आणि घडलेसुद्धा तसेच.
भारताने ही चाचणी केल्याचे जाहीर करताच अमेरिकेने लगेच परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा स्थगित केली आणि भारतावर निर्बंध लादले. माजी पंतप्रधान वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने त्या सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना केला व आपली अणवस्त्र संपन्नता शांततेसाठी असल्याचे जगाला पटवून दिले. खरे पाहिले तर भारताची स्थिती आजच्यासारखी भक्कम नव्हती. तरीही भारताने हे धाडसी पाऊल उचलले होते. याची आठवण म्हणून ११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment