संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त (वैशाख कृष्ण दशमी) त्यांच्याविषयी...

संत मुक्ताबाई मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. या संतांबरोबरच अनेक स्त्री संतही होत्या. ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला, ज्यांनी मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले, ज्यांना असामान्य बुद्धिमता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, त्या म्हणजे भक्तियोग मार्गात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांच्या भगिनी म्हणजेच संत मुक्ताबाई.

संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन १२७९मध्ये झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. त्या मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता ही चार मुले जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृ-पितृत्व धन्य करणारी! आई-वडिलांनी देहत्याग केल्यानंतर पोरवयातच निवृत्तिनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना करण्यात आली; पण हे सारे भोग सोसत या चारही भावंडांनी अखंड उपासना केली. आई-वडलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे त्यांनी उचलली आणि पेलली. आपल्या भावंडांची जणू ती माउलीच झाली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ, गंभीर, सोशिक समंजस बनल्या.

मुक्ताबाईच्या हातूनही विश्व उद्धाराचे कार्य घडले. योगी चांगदेव मोठे तपस्वी होते; पण त्यांनी गुरू केले नव्हते म्हणून त्यांना ईश्वरदर्शन झाले नव्हते. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना ‘पासष्टी’चा अर्थ उलगडून दाखवला. मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली, तेव्हा त्यांचे १४०० वर्षांचे आयुष्य धन्य झाले. आठ वर्षांची मुक्ताई १४०० वर्षांच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरू बनली. कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, “मुक्ताई करे लेइले अंजन.”

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून या अभंगांमध्ये त्यांनी विनवणी केली आहे. त्यांनी ज्ञानेश्वरांना, आदिनाथांपासून गहिनीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती, ज्ञानदेवांकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले, तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दांत समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग. 

संत ज्ञानेश्वरांना समजवताना त्या म्हणतात, “आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली, म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात, हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात,” असा बहुमूल्य उपदेश इवल्याशा मुक्ताईने संत ज्ञानेश्वरांना दिला. यातूनच त्यांचे मोठेपण समजून येते. ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तिनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंच्या ध्येयस्वप्नांची जाणीव होती. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईच्या अभंग रचना आहेत. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाठाचेसुद्धा अभंग लिहिले आहेत. मुक्ताबाईंचे विचार फार साधे, मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयत्री म्हणून आजदेखील त्यांचा नामोल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ‘ज्ञानबोध’ या ग्रंथाचेही लेखन केले आहे. या ग्रंथामध्ये संत निवृत्तिनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे.

संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. तो दिवस होता वैशाख कृष्ण दशमी शके १२१९. (इसवी सनानुसार मे १२९७) मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे.

(संदर्भ : www.santsahitya.in)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 521 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 521 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement