अमृत परिवार सर्वेक्षण सुरू असताना धुळे जिल्ह्यात आलेला अनुभव
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणावेळी योगेश अहिरे यांना आलेला अनुभव...
अमृत परिवार सर्वेक्षण करताना धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा गावात गेलो होतो. तेथे दिलीप खंडेश्वर कुलकर्णी यांची भेट घेतली. ते ब्राह्मण समाजातील अत्यंत गरीब शेतकरी आहेत. त्यांना अमृत संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांचे परिवार सर्वेक्षण केले. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितले, की 'आम्हाला घरकुल मंजूर होत नाही.' मी त्यांना कारण विचारले, तर ते म्हणाले, 'आम्ही ब्राह्मण समाजातील शेतकरी आहोत. म्हणून आम्हाला ग्रामसेवक आणि सरपंच नकार देतात. 'तुमच्याकडे शेती आहे, हे आहे, ते आहे' असे करून प्रत्येक वेळी नकार दिला जातो. त्यामुळे आम्ही घरकुलापासून वंचित राहिलो आहोत.'
हे ऐकल्यावर मी लागलीच ग्रामसेवकांचा नंबर मागितला आणि त्यांना तत्काळ कॉल केला. त्यांना मी माझा परिचय सांगितला. नंतर दिलीप कुलकर्णींना घरकुल का मंजूर होत नाही, त्यांना या योजनेचा लाभ का मिळत नाही, याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली. मग ग्रामसेवकांनी सांगितले, की 'आपण भेटून चर्चा करू. मी त्यांचे घरकुलाचे काम करून देईन.' मी त्यांचे आभार मानले. हे ऐकून दिलीप कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सौ. वसुंधराताई यांना खूप आनंद झाला. त्यांचा हसरा चेहरा बघून माझ्याही मनाला खूप शांती मिळाली. सौ. वसुंधराताईंनी मला प्रेमाची भेट म्हणून थैली भरून भुईमुगाच्या शेंगा दिल्या.
आपल्या एका कॉलमुळे असे विधायक कार्य घडत असेल, तर मी ते कार्य अद्याप का केले नव्हते, असा प्रश्नही मला पडला. तसेच आणखीही एक गोष्ट लक्षात आली आणि अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या दूरदृष्टीला दाद द्यावीशी वाटली. त्यांनी ट्रूकॉलरवर माझ्या फोन नंबरचे नाव सिस्टिमॅटिक पद्धतीने सेट करायला लावले होते. त्यामुळेच हे सारे घडून आले होते.
योगेश अहिरे
जिल्हा व्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment