रायगड जिल्ह्यातील सर्वेक्षणात आलेले अनुभव
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील सर्वेक्षणावेळी आलेले अनुभव....
अमृत परिवार सर्वेक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील तालुक्या-तालुक्यात फिरताना अनेक कुटुंबांशी प्रत्यक्ष संवाद साधला. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील कुटुंबांना भेटताना त्यांच्या अडचणी, अपेक्षा, गरजा आणि काही ठिकाणी भीषण वास्तव परिस्थिती जवळून जाणून घेता आली. विशेषतः रायगड जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा विचार करता, अमृत संस्थेच्या योजनांची आवश्यकता किती व्यापक आहे, याची ठळक जाणीव कुटुंब सर्वेक्षण करताना झाली. अनेक ठिकाणी योजनांविषयी कमी माहिती असल्यामुळे लोक वंचित राहतात, हेही स्पष्टपणे जाणवले.
या प्रवासात मुरुड, रसायनी, अलिबाग परिसर अशा काही ठिकाणी अतिशय आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. त्यामुळे काम करण्याची प्रेरणा अधिक वाढली. काही ठिकाणी विविध शंका आणि गैरसमज यांना सामोरे जावे लागले; मात्र या प्रत्येक अनुभवामुळे योजनांची माहिती अधिक विस्तृतपणे समजावून सांगता आली आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची संधी मिळाली.
जिल्हाभरातील या प्रवासामध्ये विविध गावांचे सरपंच व पदाधिकारी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते यांची भेट झाली. त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण झाली आणि अमृत संस्थेच्या सुंदर कार्याबद्दल अधिक प्रभावीपणे कसे पटवून देता येईल याबाबत सकारात्मक चर्चा घडली. या भेटींमुळे एक मजबूत सामाजिक जाळे तयार होत असल्याची जाणीव झाली. ही बाब भविष्यातील कामासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. या संपूर्ण कुटुंब सर्वेक्षणाच्या प्रवासात प्रत्येक दिवस नवा अनुभव देणारा ठरला. कधी एखाद्या कुटुंबाच्या समस्येने मन हेलावून गेले, तर कधी त्यांच्या आशावादी दृष्टिकोनाने प्रेरणा मिळाली. सर्वेक्षणाच्या माध्यमातून केवळ माहिती संकलन न होता, एक भावनिक नाते तयार होत गेले, हेच या कुटुंब सर्वेक्षणाचे खरे यश म्हणता येईल.
एकूणच, अमृत परिवार सर्वेक्षण अत्यंत यशस्वीपणे पार पडले. या प्रवासातून निर्माण झालेल्या नव्या ओळखी, मिळालेले अनुभव, समाजाशी दृढ झालेला संवाद आणि सेवाभावाची वाढ हीच या कार्याची खरी कमाई ठरली. भविष्यात या सर्व गोष्टींचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल, याची खात्री वाटते.
या दौऱ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या निमित्ताने आमच्या भागातील प्रसिद्ध कोकणी मेवा चाखता आला. उदा. जांभळे, करवंदे, ताडगोळे, इत्यादी. (एरव्ही हे शक्य होत नाही.) प्रत्येक कुटुंबातील प्रेमाचा पाहुणचारसुद्धा अनुभवायला मिळाला. चहा, कोकम सरबत, पन्हे आदींचा आस्वाद घेताना उन्हामुळे आलेला शीण पळून जात होता आणि सर्वेक्षणासाठी नवा जोम येत होता. जेवणाचा प्रचंड आग्रह हेच आपल्या कोकणवासीयांचे वैशिष्ट्य आहे.
अमृत संस्थेने अशी संधी दिल्यामुळे हे अनुभव घेता आले. समाजसेवेच्या या अर्थपूर्ण प्रवासासाठी अमृत संस्थेचे मनापासून आभार!
शैलेश विनायक मराठे
रायगड जिल्हा व्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment