बालसाहित्यकार वि. म. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त (१३ मे) त्यांचा अल्प परिचय...
कवी, कथालेखक, कादंबरीकार, बालगीतकार, संपादक, तसेच बालसाहित्यकार प्रा. वि. म. कुलकर्णी यांचे संपूर्ण नाव विनायक महादेव कुलकर्णी. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१७ रोजी सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मणेराजुरी येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. १९४०मध्ये मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते तर्खडकर सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून १९४२मध्ये मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते एमए झाले आणि चिपळूणकर पारितोषिकाचे मानकरी ठरले. नंतर बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी १९५०मध्ये 'नाटककार खाडिलकर' या विषयावर प्रबंध लिहून पीएचडी संपादन केली. त्यानंतर ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये रुजू झाले आणि १९७७मध्ये निवृत्त झाले. दयानंद कॉलेज येथे त्यांनी मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तसेच त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे तीन वर्षे अध्यक्षपद सांभाळले होते.
त्यांच्या 'लमाणांचा तांडा', 'अणुस्फोट', 'वेसण', 'भट्टी' यांसारख्या कवितांमधून त्यांनी सामाजिक विषमतेचे व त्यातील वेदनांचे वर्णन केले आहे. त्यांच्या लेखनसंपदेमध्ये पेशवे बखर (ग्रंथसंपादन), न्याहरी (कथासंग्रह), मराठी सुनीत (ग्रंथसंपादन), मुक्तेश्वर सभापर्व (ग्रंथसंपादन), राम जोशीकृत लावण्या (ग्रंथसंपादन), रामसुतकृत साधूविलास (संपादित ग्रंथ) यांचा समावेश आहे. त्यांनी वृत्ते व अलंकार, साहित्यदर्शन या ग्रंथाचे तसेच साहित्यशोभा-वाचनमालेचे संपादनही केले. त्यांनी ग्रामजीवनावर आधारित 'आहुती' ही कादंबरी लिहिली.
बालचमूसाठी त्यांनी अंगत पंगत, चंद्राची गाडी, छान छान गाणी, रंगपंचमी, ललकार हे बालकवितासंग्रह प्रसिद्ध केले. त्यांच्या काव्यसंपदेतील आश्विनी, कमळवेल, पाऊलखुणा, पहाटवारा, प्रसाद रामायण, भाववीणा, मृगधारा असे काव्यसंग्रही प्रकाशित झाले. त्यांच्या अनेक कवितांना बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून स्थान मिळाले आहे. त्यातील एक म्हणजे 'चावडीच्या मागे जुना सरकारी वाडा... अर्ध्या पडक्या भिंतीचा ठार पांढरा केवढा' या कवितेमधून जुनाट इमरतीमधील शाळा, तिचा गूढ परिसर याचे इतके सुंदर वर्णन केले आहे, की तेथील पडक्या भिंती डोळ्यासमोर येतात व मैदानातील पिंपळवृक्ष वाऱ्याने पडतो की काय, असे वाटते. 'शिट्टी कशी वाजे बघा कुक कुक कुक… इंजिनाचा धूर निघे भक भक भक' ही त्यांची आणखी एक कविता सध्याच्या बुलेट ट्रेनच्या जमान्यातही आबालवृद्धांना आपल्या लहानपणात घेऊन जाते. त्यांची अनेक गीते स्वरबद्ध झाली आहेत. त्यापैकी 'आम्ही जवान देशाचे' हे गीत पंडितराव नगरकर यांनी, 'माझ्या मराठीची गोडी' हे गीत कमलाकर भागवत यांनी तर 'माझा उजळ उंबरा' हे गीत गजानन वाटवे यांनी गायले होते. त्यांना गदिमा पुरस्कार, कविश्रेष्ठ भा. रा. तांबे पुरस्कार, दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार, उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतर ते पुण्याला स्थायिक झाले. १३ मे २०१० रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment