डॉ. इंदूताई पटवर्धन

'आनंदग्राम'च्या संस्थापिका, थोर समाजसेविका, सेवाव्रती डॉ. इंदूताई पटवर्धन यांच्या जन्मदिनानिमित्त (१४ मे) त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा...

डॉ. इंदूताई पटवर्धन मुख्य फोटो
मुख्य फोटो

कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदवन फुलवणाऱ्या आणि निरंतर समाजसेवा हेच आपल्या आयुष्याचे ब्रीद मानणाऱ्या 'आनंदग्राम'च्या संस्थापिका, थोर समाजसेविका, सेवाव्रती म्हणजे डॉ. इंदूताई पटवर्धन. समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, राजकुमारी डॉ. इंदूताई पटवर्धन यांचा जन्म जमखिंडीच्या राजघराण्यात १४ मे १९२६ रोजी झाला. इंदूताईंचे शिक्षण जमखिंडी व कोल्हापूर येथे झाले. राजकुमारी म्हणून जन्मलेल्या इंदूताईंनी वयाच्या १६व्या वर्षी गांधीजींच्या चळवळीला वाहून घेतले. मॉंटेसरी शिक्षणक्रम पूर्ण करून त्या सेंट कोलंबो स्कूलमध्ये शिक्षिका बनल्या. पुढे ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन अ‍ॅम्ब्युलन्सच्या कामामध्ये दाखल झाल्या. दुसऱ्या महायुद्धात त्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर जखमी लष्करी जवानांच्या शुश्रुषेसाठी ब्रह्मदेश, जावा येथे गेल्या. सिंगापूर, जपान, येथेही त्यांनी काम केले. १९५३मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी होमिओपॅथीचे शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथे दवाखाना सुरू केला. पूना विमेन्स कौन्सिलचे कामही त्या करत होत्या. पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या त्या संस्थापक-सदस्या होत्या. लष्करातील जवान व आदिवासी समाजातील आजारी, जखमी रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यासाठी त्या जन्मभर अविवाहित राहिल्या. मुंबई भागात आपले जमखंडी संस्थान विलीन करणारे त्यांचे भाऊ राजा परशुराम शंकरराव पटवर्धन हे भारतीय राजघराण्यांपैकी पहिले संस्थानिक होते. पुणे येथील पूना कॉलेजला सर परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या स्मरणार्थ दोन लाख रुपये इतकी देणगी त्यांनी दिली होती व तेव्हापासून ते कॉलेज सर परशुरामभाऊ कॉलेज (एस. पी. कॉलेज) म्हणून ओळखले जाऊ लागले. 


ऑक्‍सफॉम या संस्थेकडून १९६१ साली मिळालेल्या १७ हजार रुपयांच्या मदतीवर पुण्याजवळच्या डुडळगाव येथील एका ओसाड जागेवर 'आनंदग्राम' या नावाने त्यांनी कुष्ठरोग्यांची वसाहत उभी केली. पश्‍चिम महाराष्ट्रात पुण्याजवळ कुष्ठरोग सेवाकेंद्र सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला कार्यकर्त्या आहेत. १९६५मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंध कायदा अमलात आल्यावर त्यांनी ८० रुग्णांसह कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले. आळंदीजवळच्या सध्याच्या 'आनंदग्राम'मध्ये त्यांनी १९७० साली स्थलांतर केले.


उला लेडी हाइड पार्कर, राधा रमणजी अशा व्यक्‍तींच्या साह्यामुळे 'आनंदग्राम'ला सध्याचे विशाल स्वरूप आले आहे, असे त्या कृतज्ञतेने उल्लेख करत असत. सध्या आश्रमात राहणाऱ्यांकडून येथे शेती, कुक्‍कुटपालन, गोपालन, कापड उद्योग आदी अनेक उपक्रम यशस्वीपणे चालवले जातात. रेशमासाठी तुतीची लागवड केली जाते. मुला-मुलींनी फुलून आलेल्या शाळा, शेतीला नियोजन करून दिलेले पाणी, सदैव कार्यरत असलेले हात, हे आनंदग्रामचे आजचे आदर्शवत चित्र आहे. खाद्यतेल सोडले तर सर्व काही इथेच बनते, धान्य पिकते, हातमागावर कपडे तयार होतात, दवाखाना, केशकर्तनालय इथे आहे. गोबरगॅस बनतो. इतके स्वयंपूर्ण गाव येथे त्यांनी उभे केले. इंदूताई पटवर्धन यांच्या कार्याची दाखल घेऊन शासनाने त्यांना दलितमित्र हा पुरस्कार प्रदान केला. ज्या रुग्णांना समाजातून दूर फेकले जाते, ज्यांचा सदैव अपमान केला जातो, हीन लेखले जाते, अशा रुग्णांचा त्यांनी मायेने सांभाळ केला. त्यांना स्वावलंबी बनवले. त्यामुळे त्यांचे कार्य खरेच अतुलनीय आहे. आठ फेब्रुवारी १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.


(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 339 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 339 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement