मुरारबाजी देशपांडे

शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या बलिदान दिनानिमित्त (१६ मे) त्यांच्या पराक्रमाची गाथा

मुरारबाजी देशपांडे मुख्य फोटो
मुख्य फोटो

मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म महाराष्ट्रातील महाड तालुक्यातील किंजळोली गावात झाला. सातारा जिल्ह्यातील जावळी हे त्यांचे मूळ गाव. प्रारंभी ते चंद्रराव मोरे यांच्या सेवेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रदेश जिंकला, तेव्हा मुरारबाजींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना साथ देण्याचे ठरवले. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नेमण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा लढा पुकारला होता. त्यांच्या एकामागोमाग एक अशा पराक्रमांनी औरंगजेब चिडला होता. मराठ्यांचे स्वराज्य ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. त्यामुळेच त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला स्वराज्यावर पाठवले. परंतु महाराजांनी लाल महालावर अचानक छापा टाकून त्याची तीन बोटे छाटली. काही कालावधीनंतर महाराजांनी सुरतेवर हल्ला करून तेथून अगणित द्रव्य आणले. सुरत ही मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी होती. सुरतेवर हल्ला करून महाराजांनी जणू मुघल साम्राज्याचे नाकच कापले. आता औरंगजेब पक्का चिडला. महाराजांना हरवणारा योद्धा त्याला पाहिजे होता. त्याच्या सुरुवातीच्या काळात सत्ता काबीज करताना त्याला मदत करणाऱ्या पराक्रमी मिर्झाराजे जयसिंगची त्याला आठवण झाली. मिर्झाराजे जयसिंगसोबत दिलेरखान, दाउदखान कुरेशी, कुबाद खान, किरतसिंग कछवाह, पुरनमल बुदेला अशी असंख्य पराक्रमी सरदार आणि अगणित दारुगोळा औरंगजेबाने दिला. एकूण ८० हजारावर फौज घेऊन मिर्झाराजा जयसिंगाने स्वराज्यावर आक्रमण केले. १६६५ साली मुघलसम्राट औरंगजेबाने मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्यावर मुघल फौजेला धाडले. दिलेरखान याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. रोज तोफेचे गोळे पुरंदर व रुद्रमाळ किल्ल्यांवर पडत होते. मराठे मोठ्या पराक्रमाने मुघलांच्या हल्ल्याला तोंड देत होते. शेवटी रुद्रमाळ किल्ला मुघलांनी जिंकला. आता दिलेरखान पूर्ण ताकदीनिशी पुरंदर किल्ल्यावर हल्ला करू लागला. परंतु मुरारबाजी आणि त्यांचे मावळे मुघलांचे प्रत्येक हल्ला परतवून लावत होते. शेवटी दिलेरखान याने पुरंदरावर अखेरचे आक्रमण केले. त्याने निवडक असे पाच हजार पठाण पुरंदरावर पाठवले. मुरारबाजी देशपांडे यांनी केवळ ७०० मावळ्यांसह मुघलांच्या हजारो सैन्याचा सामना केला. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैनिकांनी प्रचंड धैर्याने लढा दिला.

दिलेरखान त्यांच्या शौर्याने प्रभावित झाला. त्यांना मुघल सैन्यात उच्च पदाची लालूच देण्याचा प्रयत्न केला; पण मुरारबाजींनी स्वाभिमानाने दिलेरखानाला उत्तर दिले, की 'आम्ही महाराजांची माणसं तुझा कौल घेतो की काय?' तेवढ्यातच दिलेरखानाने बाण मारला आणि त्यात मुरारबाजी देशपांडे यांना १६ मे १६६५ रोजी वीरमरण आले.

दिलेरखान याला स्वराज्यातील मावळे किती पराक्रमी आहेत याची जाणीव झाली; मात्र मुरारबाजीसारख्या शूर मावळ्यामुळे हा किल्ला जिंकणे किती अवघड आहे याची जाणीव दिलेरखानाला झाली. मुरारबाजी देशपांडे यांच्या प्रखर पराक्रमाने दिलेरखानसारखा योद्धाही प्रभावित झाला होता. मुरारबाजी देशपांडे यांच्या मृत्यूनंतर ही मराठे अधिक प्रखरपणे लढू लागले. पुरंदरच्या तह होईपर्यंत हे पुरंदरचे युद्ध सुरूच होते. शेवटपर्यंत मराठ्यांनी दिलेरखानाला पुरंदर किल्ला जिंकू दिला नाही. मुरारबाजी देशपांडे यांचे जीवन हे निष्ठा, शौर्य आणि स्वराज्याच्या आदर्शांचे प्रतीक आहे. त्यांचे बलिदान आजही प्रेरणादायक आहे. अशा या थोर लढवय्याला त्रिवार वंदन!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 16-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 413 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 16-05-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 413 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement