अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली तालुक्यातील अनुभव
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यातील काही अनुभव....
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली तालुक्यातील अनेक गावांमधील समाजाचे अत्यंत वेदनादायी वास्तव दिसले. नांदगाव खंडेश्वर मधील मंगरूळ चव्हाळा, लोणीपासून फूल आमलापर्यंत आणि भातकुली तालुक्यातील हरताळापासून सायतपर्यंत, आसरा आणि परिसरातील गावांमध्ये भेट दिली. त्या वेळी दिसलेल्या अनेक कुटुंबांच्या संघर्षमय जीवनामुळे मन हेलावले.
काही घरांमध्ये तरुण रोजगाराच्या शोधात आणि मोलमजुरीसाठी दूरवरच्या शहरांकडे गेलेले, तर मागे फक्त वृद्ध आई-वडील एकाकीपणे संसार सांभाळताना दिसले. अनेक ठिकाणी वृद्ध दाम्पत्ये आजारपण, औषधांचा खर्च आणि आधाराच्या कमतरतेत दिवस कंठताना आढळले. काही कुटुंबांमध्ये गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रासलेले सदस्य होते; पण आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची की उपचार करणेही कठीण झाले होते.
काही ठिकाणी लहान व्यवसाय सुरू करून स्वतःचे आयुष्य बदलण्याची जिद्द दिसत होती. परंतु भांडवलाच्या अभावामुळे स्वप्ने अर्धवटच राहिलेली दिसली. मेहनत करण्याची तयारी असूनही आर्थिक मदत, योग्य मार्गदर्शन आणि संधींच्या अभावामुळे अनेक हात हतबल झालेले जाणवले. काही घरांमध्ये मुलांच्या शिक्षणाची चिंता, तर काही ठिकाणी रोजच्या उदरनिर्वाहासाठीची धडपड इतकी तीव्र होती, की भविष्याचा विचारही कठीण वाटत होता.
घराघरांत जाऊन संवाद साधताना हे प्रकर्षाने जाणवले, की अनेक कुटुंबांना सरकारी योजनांची माहिती नव्हती; पण आशा मात्र होती. त्यांच्या डोळ्यांतील अपेक्षा, संघर्ष आणि जगण्याची धडपड मनाला चटका लावणारी होती. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देऊन नोंदणी करताना अनेकांसाठी ही केवळ प्रक्रिया नव्हती, तर त्यांच्या आयुष्यात बदलाची एक शक्यता होती. ती समाधान देणारी होती.
या सर्वेक्षणाने जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली तालुक्यातील वंचित, संघर्षशील आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांचे वास्तव समोर आले. हे अभियान केवळ माहिती गोळा करण्यापुरते मर्यादित न राहता, समाजातील वेदना समजून घेऊन आशेचा हात पुढे करण्याचे संवेदनशील प्रयत्न ठरले. अनेक अश्रूंना आधार, अनेक संघर्षांना दिशा आणि अनेक अपूर्ण स्वप्नांना नवी आशा देणारा हा अनुभव कायम स्मरणात राहणारा ठरला.
केदार गोगरकर
अमरावती जिल्हा व्यवस्थापक ,अमृत
संपर्क : 9112227635
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment