घराघरांत पोहोचते आहे अमृत संस्थेचे कार्य; सिंधुदुर्गात परिवार सर्वेक्षणाला उत्तम प्रतिसाद
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही अनुभव....
ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या, तसेच दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पवित्र भूमीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमृत संस्थेच्या परिवार सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ झाला. समुद्रकिनारी वसलेले, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे कुणकेश्वर गाव या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात होण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. या ठिकाणाहून सुरू झालेल्या सर्वेक्षणामुळे संपूर्ण मोहिमेला एक सकारात्मक दिशा आणि समाजकार्याची ऊर्जा मिळाली.
अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या परिवार सर्वेक्षणाचा उद्देश केवळ माहिती गोळा करणे हा नसून समाजातील लक्ष्यित घटकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांच्या समस्या, गरजा, परिस्थिती आणि शासनाच्या विविध योजनांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. गावोगावी, वाडी-वस्त्यांवर, घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधताना अनेक नवीन अनुभव आले. प्रत्येक गावाची संस्कृती, लोकांचे जीवनमान, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या अपेक्षा जवळून समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळाली.
सर्वेक्षणात अनेक ठिकाणी कुटुंबांचा अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करून सर्वेक्षणासाठी सहकार्य केले. अनेकांनी आपल्या कुटुंबातील परिस्थिती, मुलांचे शिक्षण, रोजगार, व्यवसाय, आरोग्य आणि विविध योजनांचा लाभ याविषयी सविस्तर माहिती दिली. काही ठिकाणी नागरिकांनी 'अशा प्रकारे प्रत्यक्ष घरी येऊन विचारपूस करणारी संस्था क्वचितच पाहायला मिळते,' अशा भावना व्यक्त करून अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या संवादातून समाजाशी एक जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे नाते निर्माण होत असल्याची भावना प्रकर्षाने जाणवली.
या प्रवासात काही ठिकाणी कठीण आणि नकारात्मक अनुभवांनाही सामोरे जावे लागले. काही कुटुंबांमध्ये सुरुवातीला संभ्रम, अविश्वास जाणवला. काही ठिकाणी वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही; मात्र अशा अनुभवांमुळे समाजकार्य करताना आवश्यक असलेला संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन अधिक दृढ झाला. प्रत्येक अनुभवाने काहीतरी नवीन शिकवले आणि पुढील कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी प्रेरणा दिली.
सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा काळ असल्यामुळे अनेक गावांमध्ये चाकरमानी आपल्या मूळ गावी परतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होण्याची एक अनोखी संधी या सर्वेक्षणातून मिळाली. मुंबई, पुणे, तसेच इतर जिल्हे आणि राज्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक नागरिकांशी संवाद साधता आला. त्यांनी अमृत संस्थेच्या उपक्रमांविषयी उत्सुकता दाखवून अधिक माहिती जाणून घेतली. काहींनी आपल्या कार्यक्षेत्रात आणि इतर भागांमध्येही अमृत संस्थेची माहिती पोहोचवण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या परिवार सर्वेक्षणाच्या माध्यमातून अमृत संस्थेचे कार्य केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता जिल्ह्याबाहेरही पोहोचत असल्याचा आनंद सर्वांना झाला.
विशेष म्हणजे, अमृत संस्थेने केलेल्या विश्वविक्रमाबद्दलही अनेक ठिकाणी नागरिकांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले. समाजहितासाठी सातत्याने राबवण्यात येणारे उपक्रम, विविध योजनांच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचणारे कार्य आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची धडपड यामुळे अमृत संस्थेबद्दल लोकांच्या मनात अभिमान आणि विश्वास निर्माण झालेला दिसून आला. अनेकांनी अमृत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देऊन पुढील उपक्रमांसाठी सहकार्य करण्याची भूमिकाही व्यक्त केली.
या परिवार सर्वेक्षण मोहिमेमुळे केवळ माहिती संकलन झाले नाही, तर समाजाशी भावनिक नाते निर्माण करण्याचे मोठे कार्य घडत आहे. गावागावांतील नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची संधी मिळाली. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांची माहिती देणे, त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून प्रभावीपणे होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे परिवार सर्वेक्षण समाजसेवा, संवाद आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
- श्रीराम केळकर
सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक, अमृत
संपर्क : 9112228760
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment