माणुसकी आणि वारसा जवळून अनुभवण्याची एक सुंदर संधी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील काही अनुभव....
अमृत परिवार सर्वेक्षणाचा उपक्रम मला खूप चांगला अनुभव देऊन गेला. या उपक्रमामुळे आम्हाला समाजातील अशा लोकांपर्यंत पोहोचता आले, ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे. आम्ही केवळ माहिती गोळा केली नाही, तर लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अमृत संस्थेच्या योजनांचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो, हे त्यांना समजावून सांगितले.
गावागावात फिरताना तिथल्या जीवनाचे खरे रूप पाहायला मिळाले. शहरातील धावपळीच्या तुलनेत ग्रामीण भागात आजही जो जिव्हाळा आणि एकोपा आहे, तो मनाला भावून गेला. तेथील ग्रामस्थांनी मोठ्या आवडीने त्यांच्या गावातील रूढी-परंपरा आणि जत्रांबद्दल माहिती दिली. लोकांमध्ये असलेली कौटुंबिक बांधिलकी आणि एकमेकांना साथ देण्याची वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे.
या सर्वेक्षणात काही ऐतिहासिक गोष्टीही अनुभवता आल्या. पुरंदरमध्ये असताना नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या १०व्या आणि ११व्या वंशजांची भेट घेण्याचे भाग्य लाभले. त्यांनी केवळ त्यांच्या वंशावळीबद्दल माहिती दिली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि महाराज ज्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, तेथील मातीदेखील आम्हाला दाखवली. तो क्षण अंगावर रोमांच आणणारा होता. या कालावधीत पुरंदरच्या जुन्या वाड्यांना भेट दिली. आजच्या सिमेंटच्या जंगलात असे पुरातन वाडे पाहायला मिळणे दुर्मीळ झाले आहे. त्या वाड्यांची रचना आणि तिथे राहणारी माणसे पाहून आपण एका वेगळ्याच काळात गेल्यासारखे वाटले. हे सर्वेक्षण म्हणजे केवळ काम नसून, माणुसकी आणि वारसा जवळून अनुभवण्याची एक सुंदर संधी ठरली! थोडक्यात सांगायचे, तर या सर्वेक्षणाने मला समाजाची खरी परिस्थिती आणि आपला गौरवशाली इतिहास या दोघांशीही जोडून दिले. हा अनुभव माझ्या कायम स्मरणात राहील.
- आदित्य कुलकर्णी
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment