मुळांना घट्ट धरून राहिले, तरच राष्ट्र सामर्थ्य टिकवून ठेवू शकते याचे स्मरण सोमनाथचे मंदिर करून देते

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेच्या अमृत महोत्सवात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

मुळांना घट्ट धरून राहिले, तरच राष्ट्र सामर्थ्य टिकवून ठेवू शकते याचे स्मरण सोमनाथचे मंदिर करून देते मुख्य फोटो
मुळांना घट्ट धरून राहिले, तरच राष्ट्र सामर्थ्य टिकवून ठेवू शकते याचे स्मरण सोमनाथचे मंदिर करून देते अतिरिक्त फोटो

प्रभास पाटण/मुंबई : 'सोमनाथ मंदिर अढळ श्रद्धा, दिव्यत्वाची अनुभूती आणि भारताच्या चैतन्याचे पवित्र प्रतीक म्हणून उभे आहे. सोमनाथ मंदिराची पुनर्उभारणी ही साधी घटना नव्हती. देशाला स्वातंत्र्य ७५ वर्षांपूर्वी मिळाले असले, तरी १९५१ साली सोमनाथ मंदिराची झालेली प्राणप्रतिष्ठा हा भारताच्या स्वतंत्र झालेल्या आत्म्याचा हुंकार होता. राष्ट्र आपल्या मुळांना घट्ट धरून राहिले, तरच ते आपले सामर्थ्य टिकवून ठेवू शकते, याचे स्मरण आपल्याला सोमनाथचे मंदिर करून देते,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर झालेल्या लोकार्पणाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज (११ मे) आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात ते बोलत होते.

'हे मंदिर म्हणजे केवळ एक मूर्त वास्तू असल्याचे समजून, त्यावर वारंवार आघात करून आक्रमकांनी या भव्य सोमनाथ मंदिराला नष्ट करण्याचे प्रयत्न केले. मंदिर पुनःपुन्हा पाडले गेले; मात्र तितक्याच वेळा ते बांधलेही गेले. प्रत्येक वेळी उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा नव्या भव्यतेने ते उंच उभे राहिले. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीने देशाने शतकानुशतके लागलेला कलंकही पुसून काढला. सोमनाथ अमृत महोत्सव पुढची हजार वर्षे भारतासाठी एक मार्गदर्शक प्रेरणा ठरेल,' असे मोदी म्हणाले.

गुजरात येथील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभास पाटण येथे विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा जागर घडवणारा सांस्कृतिक सोहळा ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेची एक हजार वर्षे' या विशेष भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात करण्यात आले होते. त्या वेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

'सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहे, हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे. महमूद गझनीपासून औरंगजेबापर्यंत अनेक परकीय आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला; मात्र मंदिराचे अस्तित्व आणि त्यामागील श्रद्धा कधीही नष्ट होऊ शकली नाही. भारत हा केवळ भौगोलिक देश नसून तर तो एक चिरंतन संस्कृती आहे. विविध मंदिरे, साधू-संत आणि सनातन परंपरेमुळे भारताचा आत्मा आजही जिवंत आहे. ‘सनातन’ म्हणजे ज्याचा अंत नाही आणि सोमनाथ मंदिर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे,' असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 11-05-2026 News publication date | Time: 07:54 PM News publication time | Views: 215 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 11-05-2026 News publication date | Time: 07:54 PM News publication time | Views: 215 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement