चंद्रपूर तालुक्यातील काही नोंदी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील काही अनुभव...
अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाची सुरुवात आठ एप्रिलपासून करण्यात आली. या सर्वेक्षणात माझ्याकडे चंद्रपूर तालुक्यातील गावांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. दताळा, अर्वात, पदामपूर, ऊर्जनगर, चोरगाव या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. परिवार सर्वेक्षणाचे काम करताना तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये संपर्क साधून लक्ष्यित गटांची माहिती गोळा केली. त्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन अमृत संस्थेबद्दल व योजनांबद्दल माहिती दिली. या कामात चांगला प्रतिसाद मिळाला, गावांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांना योजनांबद्दल समजावून सांगितले. अनेक लोकांनी उत्सुकतेने माहिती घेतली आणि पुढे लाभ घेण्याची तयारी दाखवली. फोनकॉल आणि प्रत्यक्ष संपर्काद्वारे तालुका स्तरावर सर्वेक्षण पूर्ण केले.
एकूण १८ गावांमध्ये अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटांतील नागरिक राहतात. तिथे वैयक्तिक भेटी देऊन त्यांच्याशी संपर्क साधला. या सर्वेक्षणामूळे गावातील लोकांची परिस्थिती, त्यांचे व्यवसाय आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या योजनांची गरज आहे हे समजले. गावातील परिस्थिती जवळून पाहता आली. एकूणच, हा अनुभव माझ्यासाठी खूप उपयोगी ठरला. यामुळे पुढील काम करताना अधिक स्पष्ट दिशा मिळणार आहे.
या दौऱ्यात अनेक पर्यटनस्थळेदेखील शोधून त्यांविषयीची माहिती गोळा केली. लोहार गावात भगवान विष्णूचे अत्यंत सुंदर व ऐतिहासिक पुरातन मंदिर आहे. त्याला ५०० ते ६०० वर्षांचा इतिहास आहे.
- श्रीरंग खोंड
अमृतमित्र, चंद्रपूर
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment