'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीचा अर्थ खऱ्या अर्थाने अनुभवता आला

अमृत परिवार सर्वेक्षणातील भंडारा जिल्ह्यातील काही अनुभव...

'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीचा अर्थ खऱ्या अर्थाने अनुभवता आला  मुख्य फोटो
'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीचा अर्थ खऱ्या अर्थाने अनुभवता आला  अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यातील काही नोंदी...

'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीचा खरा अर्थ मला आठ एप्रिल ते दोन मे २०२६ या कालावधीत प्रकर्षाने अनुभवता आला. अमृत परिवार सर्वेक्षण या उपक्रमात शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य मिळाले. जिल्हा आरोग्य केंद्राच्या आधिपत्याखाली आशा सेविका, तसेच पंचायत समितीतील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा हा उपक्रम यशस्वी होण्यात सिंहाचा वाटा आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर, लाखनी, साकोली, पवनी व लाखांदूर या ग्रामीण भागात मी प्रत्यक्ष भेटी दिल्या. सर्वेक्षण हा माझ्यासाठी एक नवीन आणि समृद्ध अनुभव होता. या सर्वेक्षणात ग्रामपंचायत सदस्य, तसेच स्थानिक प्रमुख व्यक्तींशी व गावातील नागरिकांशी थेट संवाद साधून लक्ष्यित गटातील कुटुंबांची लोकसंख्या आहे की नाही याविषयीची माहिती गोळा करण्यात आली. सर्वेक्षणासाठी आवश्यक माहिती अचूक आणि व्यवस्थित पद्धतीने संकलित करण्यावर विशेष भर देण्यात आला. आशा सेविका व ग्रामविकास अधिकारी यांच्या सहकार्यामुळे काम अधिक सुलभ झाले. सर्वेक्षणाच्या कालावधीत गावागावांत फिरताना अनेक कुटुंबांना प्रत्यक्ष भेटलो. प्रत्येक भेटीत मी अभियानाचे महत्त्व समजावून सांगून, अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आणि लाभ घेण्यासाठी त्यांना प्रेरित केले. शासकीय योजनांविषयी योग्य मार्गदर्शन मिळाल्याने अनेक कुटुंबांमध्ये जागरूकता वाढताना दिसली आणि त्यांचा सकारात्मक प्रतिसादही जाणवला. 

या संवादातून लोकांच्या शिक्षण, रोजगार व सामाजिक या विषयांतील अडचणी जवळून समजून घेता आल्या. ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पोस्टर लावून जनजागृती केली, तर प्रत्यक्ष भेटींमुळे लोकांशी विश्वासाचे नाते निर्माण झाले. काही कुटुंबांतील एकोपा मनाला भावला, तर काहींच्या अडचणींनी विचार करायला भाग पाडले. अनेक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य मिळाले. काहींनी आपल्या समस्या व अपेक्षाही मांडल्या. अनेक ग्रामभेटींमध्ये असे लक्षात आले, की त्या गावामध्ये अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लोकसंख्या नाही. अनेक गावांत पाणी शिरल्यामुळे गावांचे पुनर्वसन झाले होते व सुविधांअभावी काही रिती गावेसुद्धा निदर्शनास आली. 

काही ठिकाणी सुरुवातीला संकोच जाणवला; मात्र संवाद वाढत गेल्यावर लोकांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडले. समाजाला अधिक जवळून जाणून घेण्याची ही एक अर्थपूर्ण संधी ठरली. विदर्भाच्या कडक उन्हात अमृत परिवार व ग्राम सर्वेक्षण करताना अनेकविध अनुभव आले. काही ठिकाणी लोकांनी आम्हाला शासकीय कर्मचारी समजून ओळखपत्राबद्दल प्रश्न विचारले; सुरुवातीचा संभ्रम संवादाने दूर झाला आणि त्यांनी सहकार्य केले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीला माझ्यावर संशय आला. त्यांनी निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेल्या परतीचा फोटो घेऊन तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्यांना पाठवला. सदस्याने तोच फोटो सरपंचांना पाठवला असता त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून सहकार्य करण्यास सांगितले. मी शांतपणे सर्वेक्षणाचा उद्देश समजावून सांगितल्यावर त्यांचा गैरसमज दूर झाला. नंतर त्याच व्यक्तीने मला त्याच गावातील इतर तीन घरांमध्ये नेऊन ओळख करून दिली. यामुळे संयम आणि स्पष्ट संवादाचे महत्त्व उमगले. दुसरीकडे, काहींनी आदरातिथ्य करत प्रेमाने स्वागत केले. या अनुभवांनी कामाला वेगळीच ऊर्जा दिली. पूर्वी आलेल्या वाईट अनुभवांमुळे सुरुवातीला शासकीय ग्रामपंचायत अधिकारीसुद्धा धजावत नसत; पण गटविकास अधिकाऱ्यांचे शिफारसपत्र दाखवल्यावर मात्र त्यांनी उत्तमरीत्या सहकार्य केले. 

जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि समृद्ध वनसंपत्तीमुळे येथे वन्य प्राण्यांचा, विशेषतः वाघ-बिबट्यांचा सक्रिय वावर जाणवतो. काही गावांना भेट देताना स्थानिकांनी अंधार होण्यापूर्वीच गाव सोडण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या सूचनेतून पाहुण्यांचीही काळजी घेणारी त्यांची जिव्हाळ्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवली आणि हा अनुभव मनात घर करून राहिला. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांनाही भेट दिली व पर्यटन क्षेत्रातील वाव लक्षात आले. काही सक्षम विद्यार्थी सापडले. त्यांना परदेशात शिक्षण घेण्याकरिता पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली आहे. काही विद्यार्थ्यांनी खेळ खेळून मातृभूमीला नावलौकिक प्राप्त करून दिला आहे, तर काहींनी विशेष परिश्रम घेऊन इस्रोसारख्या नामवंत संस्थेत जुनियर सायंटिस्ट म्हणून रुजू झाले आहेत. 

अशा यशस्वी विद्यार्थ्यांमुळे भावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेलच, शिवाय त्यांच्या प्रवासातून प्रेरणा घेण्याची ऊर्मीही निर्माण होईल. विद्यार्थ्यांबरोबरच उद्योजकांच्या अनुभवांतून भावी पिढीला दिशा, प्रेरणा आणि नवचैतन्य लाभेल. अशाच सक्षम हातांमुळे भारतभूमी पुन्हा विश्वगुरू बनण्याचा मार्ग अधिक प्रकाशमान होईल. प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते, हे या अनुभवांतून प्रकर्षाने जाणवले; मात्र प्रामाणिक संवादाने विश्वास सहज जिंकता येतो, हेही उमगले. सर्वेक्षण हे केवळ माहिती संकलन नसून, समाजाला समजून घेण्याचा आणि सकारात्मक बदलाची दिशा देणारा प्रवास ठरला. अमृत परिवार सर्वेक्षणामुळे ग्रामीण भागात दृढ संपर्क निर्माण झाला असून, याच आधारावर भविष्यात अधिक प्रभावी काम करता येईल, असा विश्वास मनात निर्माण झाला.

ओमकार हरदास

भंडारा जिल्हा व्यवस्थापक, अमृत


Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 13-05-2026 News publication date | Time: 05:28 PM News publication time | Views: 430 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 13-05-2026 News publication date | Time: 05:28 PM News publication time | Views: 430 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement