शासनव्यवस्थेचा भाग बनून कामाची संधी देणारा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम

पदवीधर युवकांसाठी सुवर्णसंधी; भरभक्कम छात्रवृत्ती आणि समृद्ध करणारा अनुभव; अर्जप्रक्रिया सुरू

शासनव्यवस्थेचा भाग बनून कामाची संधी देणारा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा युवकांना शासनव्यवस्थेचा प्रत्यक्ष भाग बनून काम करण्याची संधी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञानाची जाण आणि उत्साही दृष्टिकोन प्रशासनाच्या कामकाजात उपयोगी पडतो. शासनाच्या विविध प्रक्रियांना अधिक गती मिळावी, तसेच तरुणांना प्रशासनाचा जवळून अनुभव मिळावा, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यंदाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची सुरुवात ८ मे २०२६ पासून झाली असून, २७ मे २०२६पर्यंत अर्ज करता येणार आहे.

या कार्यक्रमाचा प्रारंभ २०१५मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या हा कार्यक्रम आठव्या वर्षात प्रवेशला असून, राज्यातील अनेक युवकांनी या माध्यमातून धोरणनिर्मिती, प्रशासन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा कालावधी १२ महिन्यांचा असतो. निवड झालेल्या फेलोंची नियुक्ती शासनाच्या विविध प्राधिकरणांमध्ये केली जाते. जिल्हाधिकारी कार्यालये, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा यामध्ये समावेश असतो. संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फेलो काम करतात. हे काम ‘फिल्ड वर्क’ म्हणून ओळखले जाते.

फेलोशिप कालावधीत फेलोंना प्रत्यक्ष प्रशासकीय अनुभवासोबतच आयआयटी मुंबईने तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक असते. फिल्ड वर्क आणि अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते.

पात्रता :

या कार्यक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २६ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि त्याला किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप अनुभव म्हणून ग्राह्य धरली जाते. पूर्णवेळ स्वयंरोजगार किंवा उद्योजकतेचाही अनुभव म्हणून विचार केला जातो. मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक असून, हिंदी, इंग्रजी, तसेच संगणक आणि इंटरनेटचे ज्ञानही अपेक्षित आहे.

निवड प्रक्रिया : दोन टप्प्यांमध्ये होते. पहिल्या टप्प्याचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ चाचणी व निबंधलेखन परीक्षा घेतली जाते. दुसरा भाग वस्तुनिष्ठ चाचणीचा असून, त्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या २१० उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी प्राथमिक निवड होते. दुसऱ्या टप्प्याचे तीन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे प्राथमिक निवड झालेल्या २१० उमेदवारांच्या निबंधांचे मूल्यांकन केले जाते. दुसरा भाग वैयक्तिक मुलाखतीचा असतो, तर तिसऱ्या भागात अंतिम निवड झालेल्या ६० उमेदवारांची यादी जाहीर केली जाते.

लाभ : फेलोंना गट-अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा दिला जातो. फेलोशिपच्या काळात त्यांना दरमहा ५६,१०० रुपये विद्यावेतन तसेच प्रवास आणि आनुषंगिक खर्चासाठी ५,४०० रुपये अशी एकूण ६१,५०० रुपये इतकी मासिक छात्रवृत्ती मिळते. याशिवाय तात्पुरते ओळखपत्र, अधिकृत ई-मेल आयडी, अपघात विमा संरक्षण आणि मर्यादित रजाही उपलब्ध करून दिली जाते.

फेलो थेट वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. त्यांना नियमित मासिक अहवाल सादर करावा लागतो. तसेच अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाकडून त्यांच्या कामगिरीचे वेळोवेळी मूल्यमापन केले जाते. या प्रक्रियेमुळे युवकांमध्ये व्यवस्थापन कौशल्य, संवादकौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि प्रशासनाविषयी व्यापक दृष्टी विकसित होते.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा केवळ शासकीय अनुभव देणारा उपक्रम नसून राज्याच्या विकास प्रक्रियेत युवकांना सहभागी करून घेणारा एक प्रभावी मंच आहे. प्रशासन आणि युवक यांच्यातील दुवा मजबूत करत राज्याच्या प्रगतीत योगदानाची संधी हा कार्यक्रम उपलब्ध करून देतो.

अधिक तपशील आणि अटी-शर्तींची संपूर्ण माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठीही तीच लिंक वापरावी. https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/indexmr.html

(निवडक शासकीय योजनांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 14-05-2026 News publication date | Time: 11:17 AM News publication time | Views: 1,812 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 14-05-2026 News publication date | Time: 11:17 AM News publication time | Views: 1,812 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

A
Amol Joshi
14-05-2026 11:46 AM

Above 26 nahi chatl ka?

Write a Comment
0 / 50 words
Advertisement