अमृत परिवार सर्वेक्षणावेळी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यातील काही नोंदी...
अमृत परिवार सर्वेक्षण मोहिमेमध्ये बऱ्याचशा नवीन गावांमध्ये प्रवास झाला. गावकऱ्यांचे वेगवेगळे विचार, त्यांची वेगवेगळी जीवनशैली बघून हे लक्षात आले, की प्रत्येकाने आपापल्या परीने या स्पर्धात्मक युगात खंबीरपणे उभे राहण्याचे मार्ग शोधण्याची चिकाटी जपून ठेवलेली आहे. त्यांना अशा संधींची गरज आहे, की ज्या त्यांच्या आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक व इतर समस्या दूर करू शकतात. कुणाला स्वतःचा उद्योग चालू करायचा आहे, पण त्याच्याकडे पुरेसे भांडवल नाही. कोणाला चांगले शिक्षण घ्यायचे आहे; पण ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना कुठेतरी माघार घ्यावी लागते. अशा समस्या या मोहिमेच्या प्रवासातून आढळल्या. अमृत संस्थेच्या काही योजना त्यांच्या समस्यांचे निवारण करू शकतात, हेही जाणवले. अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण असो वा शैक्षणिक अर्थसाह्य योजना असोत, अशा अनेक योजना त्यांना अनेक उपयोगी ठरू शकतात.
सर्वेक्षणामध्ये खूप वेळा नागरिकांनी मला शासकीय प्रतिनिधी म्हणून मान दिला. जेव्हा त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली, तेव्हा त्यांच्या हावभावातून लक्षात येत होते, की त्यांना जणू एक आधारस्तंभ मिळाला. अमृत संस्था म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी एक आशेचा किरण आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
पर्यटनस्थळे
आरमोरी तालुक्यातील वैरागड या गावामध्ये भंडारेश्वर महादेव हे मंदिर अतिशय प्राचीन व जिल्ह्यात लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे. श्री भंडारेश्वर महादेव मंदिर या मंदिराचा इतिहास सुमारे ८०० ते १००० वर्षे जुने आहे, अशी मान्यता आहे. आरमोरीवरून सुमारे १२ किलोमीटरवर असलेल्या या पर्यटनस्थळी दर वर्षी सुमारे २० ते ३० हजार भाविक भेट देतात आणि प्राचीन कला पाहतात. वैरागड या गावामध्ये सुमारे ४००-५०० वर्षे जुना गडसुद्धा आहे. गडचिरोलीतील राजेशाहीचा इतिहास अतिशय क्रांतिकारी व प्रेरणादायी ठरला आहे. राजा विराट या ठिकाणी राज्य करत होता. त्याचप्रमाणे अनेक गोंड राजांचेही या किल्ल्यावर राज्य होते.
- वेदांत सुनील मेहता
अमृतमित्र
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment