अमृत परिवार सर्वेक्षण : लाभार्थी आणि योजनांमधील विश्वासाचा सेतू

भंडारा जिल्ह्यातील अनुभव आणि नोंदी

अमृत परिवार सर्वेक्षण : लाभार्थी आणि योजनांमधील विश्वासाचा सेतू मुख्य फोटो
अमृत परिवार सर्वेक्षण : लाभार्थी आणि योजनांमधील विश्वासाचा सेतू अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यातील काही नोंदी...

अभियानाची सुरुवात आठ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली. या सर्वेक्षणाचा उद्देश अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील सर्व कुटुंबांची अचूक व तपशीलवार माहिती ग्रामीण स्तरापासून, तर जिल्हा स्तरापर्यंत संकलित करणे हा होता. या अभियानाच्या यशस्वितेकरिता शासन स्तरावरून सहकार्य मिळावे, या दृष्टीने संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयातून पत्र मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा व्यवस्थापकांच्या नावाने पत्रे निर्गमित करण्यात आली. त्यामुळे सर्वेक्षण कालावधीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका व आशा सेविका या सर्वांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम व्यवस्थितपणे व शिस्तीत पार पाडता आले. 

लक्ष्यित गटाच्या समाज संघटनादेखील आमच्यासोबत असल्याकारणाने त्या त्या समाजातील विशेष उत्सव, उदा. ठाकूर समाज - महाराणा प्रताप जयंती, राजस्थानी समाज - गण गौर, ब्राह्मण समाज - चैत्रगौर, बंगाली समाज - दुर्गापूजा, सिंधी समाज - झुलेलाल जयंती, तसेच कोजागिरी, गणेशोत्सव आणि महिला दिन या सामूहिक कार्यक्रमांच्या आयोजनांमध्ये आम्हाला सहभागी करून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. परिवार सर्वेक्षण व समाजातील व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या माध्यमातून अमृत संस्थेची नाळ आता थेट लाभार्थ्यांशी जोडली गेली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे योजना सहज पोहोचू लागल्या असून, आता केवळ समाजाची सकारात्मक मानसिकता, दृष्टिकोन आणि सहकार्य मिळाल्यास अमृत संस्थेचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असा विश्वास वाटतो.

कार्यपद्धती 

भंडारा व मोहाडी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचून ग्रामीण भागातील लक्ष्यित गटातील प्रत्येक परिवारापर्यंत अमृत संस्थेची माहिती पोहोचावी, असा माझा ध्यास होता. स्टिकरवरील माहितीच्या माध्यमातून गरजू व्यक्ती योग्य वेळी जोडली जाऊन लाभ घेईल, असा मला ठाम विश्वास आहे.

सर्वेक्षण कालावधीत स्थानिक प्रमुख व्यक्तींना, संपर्कस्थानांना भेट देऊन, संवाद साधून, प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि फॉर्म भरून घेतले. त्यांना अभियानाचे महत्त्व आणि अमृत संस्थेच्या योजना समजावून सांगितल्या. सर्वेक्षण कालावधीत लक्ष्यित गटाच्या समस्या, गरजा, अपेक्षा, जीवनमान याचा सखोल आढावा घेतला. स्टिकर्सची या अभियानात मोलाची भूमिका होती. 

अनुभव व निरीक्षणे 

या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. काहींनी परिचयपत्राचा आग्रह धरला आणि माहिती दिली नाही. हाच अनुभव काही ग्रामपंचायतीतदेखील भेडसावला. शासकीय स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दाखले दिले, तसेच शासकीय पत्र दाखवल्यानंतर सहकार्य मिळाले. सर्वेक्षण कालावधीत उन्हाळ्याच्या भरपूर त्रास झाला. आवश्यक ती काळजी घेत असल्यामुळे व लक्ष्यित गटातील परिवारांच्या पाहुणचारामुळे प्रवास सुकर झाला. 

पर्यटन 

भंडारा हा तलावांचा जिल्हा असून, येथे वनसंपदा असून जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व लाभलेले आहे. या जिल्ह्यात रानमेवा, तांदूळ, मत्स्य व्यवसाय, पितळी व तांब्यांची भांडी आणि कोसा यावर आधारित प्रकल्प उभारले जाऊ शकतात. तालुका पातळीवर अमृत पर्यटनमित्र असल्यास सर्व धार्मिक व सांस्कृतिक केंद्राची माहिती अधिक पर्यटकांपर्यंत पोहोचेल. 

वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे 


भंडारा व मोहाडी तालुक्यात आठ एप्रिल ते दोन मे या कालावधीत अभियानांतर्गत एकूण १०० ग्रामपंचायती, तसेच ९१ परिवारांना भेटी देण्यात आल्या असून, त्यापैकी ६४ कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात लक्ष्यित गटातील घटकांची संख्या मुळात कमी असून, लक्ष्यित गटातील युवा वर्ग शिक्षणाकरिता बाहेरगावी असतो, असे प्रत्यक्षात दिसून आले. मला या सर्वेक्षणात भरभरून व चांगले सहकार्य मिळाले. कित्येक परिवारांनी योजनांबद्दल अमृत संस्थेचे आभार मानले. समाजकार्य म्हणून कार्य करत असलेल्या आमच्यासारख्या समाजसेवकांचे कौतुक केले. या योजना जास्तीत जास्त ज्ञातिबांधवांपर्यंत पोहोचवण्याची हमीदेखील घेतली. परगावचे संपर्कदेखील दिले. आमच्या जिल्ह्यातील संपर्कांपर्यंत आम्ही पोहोचणार असून, इतर जिल्ह्यांचे संपर्क त्या त्या जिल्ह्यांच्या अमृतमित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अमृत संस्थेच्या सूर्यमित्र, ड्रोन, बेकरी या प्रशिक्षणांना प्रतिसाद मिळाला; पण लाभार्थ्यांचे कागदपत्रे व आवश्यक दस्तऐवज अद्ययावत नसल्यामुळे प्रशिक्षणाची बॅच सुरू करण्याकरिता विलंब होत आहे. सातत्याने आम्ही प्रत्यक्ष भेटी घेऊन कागदपत्रांचा आढावा व पाठपुरावा करीत आहोत, जेणेकरून बॅचेस लवकरात लवकर सुरू करता येतील.

हेमंत चंदवासकर

अमृतमित्र

Publisher: Hemant Chandwaskar News publisher name | Date: 15-05-2026 News publication date | Time: 12:08 PM News publication time | Views: 278 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: Hemant Chandwaskar News publisher name | Date: 15-05-2026 News publication date | Time: 12:08 PM News publication time | Views: 278 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement