पुण्य, प्रार्थना आणि सकारात्मकतेचा अधिक मास
हिंदू पंचांग हे प्रामुख्याने चंद्र चक्रावर अर्थात चांद्रमासावर आधारित असते. एक चांद्र महिना सुमारे २९.५ दिवसांचा असतो आणि वर्षभरातील १२ महिन्यांचे मिळून एकूण ३५४ दिवस होतात. दुसरीकडे, पृथ्वीचे सूर्याभोवतीचे एक चक्र पूर्ण होण्याचा सौर वर्षाचा कालावधी ३६५.२४२२ दिवस म्हणजेच सुमारे ३६५ दिवसांचा असतो.
सौर आणि चंद्र वर्षामध्ये दरवर्षी सुमारे १०.८७ दिवसांचा (साधारण ११ दिवसांचा) फरक पडतो. तीन वर्षांत हा फरक ३२ ते ३३ दिवसांचा (एक पूर्ण महिना) होतो. हा जास्तीचा महिना (अधिक मास) पंचांगात जोडला गेला नाही, तर सण-उत्सव आणि ऋतुचक्रात मोठा गोंधळ उडू शकतो. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात येणारी होळी आणि हिवाळ्यात येणारी दिवाळी पावसाळ्यात येऊ शकते.
ऋषीमुनींनी निर्माण केलेली हिंदू कालमापन पद्धती खगोलीय स्थितीवर (सूर्य आणि चंद्राची गती) आधारित अतिशय वैज्ञानिक आणि अचूक आहे. या गणितीय प्रणालीला तंतोतंत जुळवून ठेवण्यासाठी अधिक मासाची निर्मिती करण्यात आली आहे.
पुरुषोत्तम मासाला अधिक मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. यंदाचा अधिक महिना १७ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत आहे. जप, तप, दान आणि पूजा यांसारख्या आध्यात्मिक कार्यांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
परंपरा : आध्यात्मिक कार्यांसाठी हा महिना महत्त्वाचा असला, तरी या काळात विवाह, साखरपुडा आणि गृहप्रवेश समारंभ यांसारखे शुभ प्रसंग सहसा टाळले जातात.
रीतीरिवाज : या महिन्यात जावई किंवा ब्राह्मण पूजन करून ३३ अनारसे किंवा यथायोग्य वस्तूंचे दान केले जाते. त्याचबरोबर अधिक मासात दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात मुलींनी आईची साडी-चोळी देऊन ओटी भरण्याचीही एक परंपरा आहे.
वैष्णवी दारव्हेकर
अमृतसखी, चंद्रपूर.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment