चंद्रपूर जिल्ह्यातील काही नोंदी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील काही नोंदी...
सर्वेक्षणात माझ्याकडे चंद्रपूर शहराचा भागांमध्ये भेटी देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सर्वप्रथम मी प्रत्येक कुटुंबाची माहिती व्यवस्थित संकलित केली. त्या त्या भागातील स्थानिक प्रमुख व्यक्तींशी संवाद साधून सर्वेक्षणाची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना अभियानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. परिवार सर्वेक्षणातून लक्ष्यित गटातील लोकांच्या विविध समस्या, गरजा आणि जीवनमानाचा आढावा घेतला गेला. जनजागृती वाढवण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी स्टिकर्स लावण्यात आले, जेणेकरून स्थानिक लक्ष्यित गटातील जनतेला माहिती मिळावी.
या संपूर्ण प्रक्रियेत लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडता आले. या परिवार सर्वेक्षणाच्या प्रवासात उन्हाचा त्रास झाला; पण समाजातील विविध घटकांमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अनुभव मिळाल्याने आनंद झाला. परिवार सर्वेक्षण अभियानातून विविध कुटुंबांची माहिती गोळा करून त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि जीवनमानाशी निगडित संवाद साधता आला. अमृत परिवार सर्वेक्षणामुळे ओळखी आणि संपर्क या दोन्ही गोष्टी वाढल्या. लोकांना त्यांच्या विकासाच्या संधींचा तपशील मिळाला.
एकूणच अमृत परिवार सर्वेक्षणामुळे स्थानिक विकासाला चालना देण्याचे काम यशस्वीरीत्या राबवण्यात आले. लक्ष्यित गटातील सुमारे साठ जणांच्या भेटी झाल्या. त्यांच्याशी संपर्क वाढवण्याकरिता त्यांच्या माहितीसह संपर्क क्रमांक गोळा करण्यात आला. अमृत परिवार सर्वेक्षणाचा अनुभव हा एकूणच आठवणीत राहणारा ठरणार आहे.
वैष्णवी दारव्हेकर
अमृतसखी, चंद्रपूर
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment