प्रख्यात नाटककार राम गणेश ग़डकरी यांच्या (२६ मे) जयंतीनिमित्त त्यांचा कार्यपरिचय...
राम गणेश गडकरी हे एक श्रेष्ठ मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी होते. त्यांनी गोविंदग्रज या नावाने कवितालेखन केले. तसेच बाळकराम या नावाने विनोदी लेखन केले. त्यांचा जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे २६ मे १८८५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण दामनगर (सौराष्ट्र) येथे झाले, तर कर्जत आणि पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यापूर्वी काही काळ त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकांत कामे करणाऱ्या मुलांचे मास्तर म्हणून काम केले. त्यांनतर विदर्भातील बाळापूर या गावी ते काही दिवस शिक्षक होते. पुण्याच्या ज्ञानप्रकाश येथे काही काळ उपसंपादक म्हणून (१९०९–१०), तसेच पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. १९१०मध्ये नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने किर्लोस्कर नाटक मंडळीशी त्यांचा पुन्हा एकदा संबंध आला. त्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखनावरच आपला चरितार्थ चालवला.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नाटकांचा आणि विनोदी लेखनाचा प्रभाव त्यांच्यावर संस्कारक्षम वयातच पडला. नाट्यविनोदाच्या संदर्भात ते कोल्हटकरांना आपले गुरू मानत असत. त्यांचे पहिले पुस्तक कोल्हटकरांच्या नाटकांतील उताऱ्यांचे आहे (१९०७). वेड्यांचा बाजार (लेखनकाळ १९०६–०७) हे त्यांचे अपूर्ण नाटक महाराष्ट्रातील एक विख्यात नट आणि गडकऱ्यांचे एक निकटचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले व ते १९२३मध्ये प्रकाशित झाले. त्यांच्या काव्याची प्रकृती केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. ‘अल्लड प्रेमास’ (१९०९) ही गडकऱ्यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. मनोरंजन मासिकात ती प्रसिद्ध झाली. याच मासिकातून १९१३–१५मध्ये त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे रिकामपणाची कामगिरी (१९२१) या नावाने प्रसिद्ध झाले. रंगभूमी या मासिकात ‘सवाई नाटकी’ या टोपण नावाने आणि कधीकधी निनावी लेखन गडकरी करत असत.
प्रेमसंन्यास (१९१३) हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. त्यानंतरची त्यांची नाटके अशी - पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) व राजसंन्यास (१९२२, अपूर्ण). वाग्वैजयंती (१९२१) या नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. त्यांचे समग्र विनोदी लेख संपूर्ण बाळकराम (१९२५) या नावाने प्रसिद्ध झाले. याशिवाय गडकऱ्यांचे बराच काळ अप्रकाशित राहिलेले साहित्य अप्रकाशित गडकरी (१९६२) या नावाने प्रल्हाद केशव अत्रे यांनी संपादित केले आहे. गडकऱ्यांच्या लेखनसंकल्पांची त्यावरून कल्पना येते. मृत्युसमयी ते विदर्भातील सावनेर या गावी होते. ते क्षयाने आजारी होते. २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचे निधन झाले.
गडकऱ्यांचे साहित्य अल्प असले, तरी मराठी मनावरील त्यांचा प्रभाव मात्र अपूर्व असून तो त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून आहे. त्यांच्या कवितेत भावोत्कटता व कल्पनाचमत्कृती यांचा एकाच वेळी प्रत्यय येतो. असाधारण कल्पनाशक्ती आणि तितकीच असाधारण शब्दशक्ती हे गडकरी वाङ्मयाचे विशेष आहेत. करुण आणि हास्य या दोन्ही रसांची निर्मिती त्यांनी आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकपणे साधली आहे. त्यांच्या सर्वच लेखनात वाचक-प्रेक्षकांच्या मनांची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य अवतरलेले आहे. उत्कटता हा त्यांच्या वृत्तीचा सहजधर्म आहे. गडकऱ्यांचे यश या असाधारण गुणविशेषांमध्ये आहे. एकच प्याल्यातील सिंधू, गीता, तळीराम, भावबंधन नाटकातील धुंडिराज, घनःश्याम, कामण्णा, प्रेमसंन्यास नाटकामधील गोकुळ, पुण्यप्रभाव नाटकातील कालिंदी आणि राजसंन्यास नाटकामधील तुळशी या गडकऱ्यांच्या नाट्यकृतींतील काही अविस्मरणीय व्यक्तिरेखा होत्या. अशा या थोर साहित्यिकाला वंदन!
(स्रोत : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment