पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांशी संवाद साधून सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा घेतला आढावा
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील काही नोंदी...
परिवार सर्वेक्षणावेळी ग्रामीण भागातील महिलांच्या दैनंदिन जीवनाचा जवळून अभ्यास केला. विविध तालुक्यांतील गावांमध्ये घरभेटी दिल्या, महिलांशी संवाद साधून त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती, रोजगाराच्या अडचणी, शेती आणि व्यवसायातील अडचणी व आर्थिक समस्यांची माहिती जाणून घेतली. महिलांना बचत गट, लघुउद्योग व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सर्वेक्षणातून ग्रामीण महिलांची जिद्द, संघर्ष आणि स्वावलंबनाच्या दिशेने असलेली वाटचाल अनुभवायला मिळाली.
या सर्वेक्षणातून ग्रामीण महिलांच्या जीवनातील विविध पैलू जवळून पाहता आले. सर्वेक्षणासाठी गावात पोहोचल्यानंतर सर्वेक्षण करताना महिलांशी संवाद साधणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे त्यांच्या समस्या, संघर्ष आणि मेहनतीची जाणीव झाली. अनेक महिला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कुटुंबासाठी मोठ्या जिद्दीने कार्य करत आहेत. सर्वेक्षणादरम्यान महिलांना रोजगारनिर्मिती, बचत गटांचे महत्त्व, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, कागदी पिशव्या बनवणे, अगरबत्ती तयार करणे यांसारख्या लघुउद्योगांविषयी मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कौशल्यविकासाचे महत्त्वही त्यांना सांगितले.
महिलांनी व्यक्त केलेल्या अनुभवांमधून समाजातील बदलत्या परिस्थितीची जाणीव झाली असून, अशा सर्वेक्षणांमुळे सामाजिक विकासाच्या योजनांना दिशा मिळण्यास मदत होत असल्याचे जाणवले.
कमलाकर भगवान कुलकर्णी पुणे जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment