बुलढाणा जिल्ह्यातील काही नोंदी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील काही नोंदी...
अमृत परिवार सर्वेक्षणासाठी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विविध गावांतील कुटुंबांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सर्वेक्षण करताना अनेक कुटुंबांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती जवळून समजून घेता आली. अमृत परिवार सर्वेक्षणाचा उद्देश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रक्रियेमुळे लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य विकसित झाले. तसेच त्यांच्या अडचणी आणि गरजा समजून घेण्याचा अनुभव मिळाला.
अनेक नागरिकांना अमृत संस्थेच्या योजनांविषयी माहिती अपुरी असल्याचे जाणवले. त्यांना योग्य मार्गदर्शन करून योजनांचा लाभ कसा मिळू शकतो याबद्दल माहिती देण्यात आली. सर्वेक्षण सुरू असताना अमृत संस्थेचे लाभार्थीही भेटले. त्यांनी अमृत संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या लाभाबद्दल कृतज्ञतादेखील व्यक्त केली. त्यामुळे समाजासाठी प्रत्यक्ष काम केल्याचे समाधान मिळाले. सर्वेक्षण करताना वेळेचे नियोजन, संयम, जबाबदारी यांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती अनुभवता आली आणि समाजाशी अधिक जवळीक निर्माण झाली.
एकूणच, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात केलेले परिवार सर्वेक्षण हे ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि समाजाभिमुख अनुभव ठरले. या उपक्रमामुळे लोकांच्या समस्या समजून घेण्यासोबतच सामाजिक कार्याची नवी दृष्टी मिळाली.
गणेश श्यामराव मुळे
अकोला जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment