नाशिक जिल्ह्यातील अनुभव
कोणत्याही संस्थेच्या प्रगतीचा पाया नियोजन आणि समर्पण या दोन स्तंभांवर उभा असतो. अमृत संस्थेने मागील वर्षाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक चिंतन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत केवळ चुकांची सुधारणा आणि कामाची मजबुती यावरच चर्चा झाली नाही, तर गेल्या वर्षीची उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण केल्याचे समाधानही व्यक्त करण्यात आले. याच आत्मविश्वासाच्या जोरावर आगामी वर्षात १२ हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नवीन ध्येय आम्ही निश्चित केले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठेचा यशस्वी प्रयोग
नाशिक विभागात कामाची सुरुवात करताना अमृतपेठ - थेट बाजारपेठ हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आमच्यासमोर होते. नाशिक येथे १२-१३ एप्रिल आणि मालेगाव येथे १३-१४ एप्रिल रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले. विशेषतः मालेगावचा विचार करता, अवघ्या एका आठवड्याच्या अल्प कालावधीत हा प्रयत्न यशस्वी करणे मोठे आव्हान होते; मात्र या प्रवासात संजय गोसावी,अजिंक्य कन्नल यांची मोलाची साथ लाभली. गेल्या वर्षभराच्या कामाचा अनुभवाच्या जोरावर आम्ही अहोरात्र कष्ट घेतले. स्टॉलधारकांचा शोध घेणे, पाहुण्यांची निश्चिती, निमंत्रण पत्रिकांचे वितरण, आणि प्रभावी प्रसिद्धी या सर्व आघाड्यांवर यशस्वी काम करून अवघ्या सात दिवसांत आम्ही हा बाजारपेठेचा उपक्रम यशस्वी करून दाखवला.
राज्यव्यापी सर्वेक्षण - एक खडतर प्रवास
आठ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण सर्वेक्षण करण्याचे ठरले. मालेगावचा कार्यक्रम संपताच १६ एप्रिलपासून आम्ही प्रत्यक्ष मैदानावर उतरलो. दिवसाला नऊ ते १० गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा धडाका लावला. या प्रवासात शिरपूर तालुक्याचा (धुळे जिल्हा) अनुभव अत्यंत आव्हानात्मक होता.
दीपक गुप्ता
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment