अमृत संस्थेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची नवी दिशा

अमृत परिवार सर्वेक्षणावेळी नाशिक जिल्ह्यात आलेले अनुभव

अमृत संस्थेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची नवी दिशा मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील काही नोंदी...

सर्वेक्षणामुळे समाजातील विविध घटकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा एक मोठा अनुभव मिळाला. सुरुवातीला चार तालुक्यांमध्ये कामाची जबाबदारी होती. त्यानंतर सहा तालुक्यांपर्यंत विस्तार झाला आणि पुढे संपूर्ण जिल्हाभर प्रवास करण्याची संधी लाभली. या प्रवासातून ग्रामीण व शहरी भागातील लोकांचे प्रश्न, अपेक्षा, गरजा आणि शासनाकडून असलेल्या आशा जवळून समजून घेता आल्या.

नाशिक जिल्ह्यातील ब्राह्मण, माहेश्वरी (मारवाडी), सिंधी, राजपूत, जाट, पटेल-पाटीदार, ठाकूर, गुजराथी, राजपुरोहित, येलमार, नायर अशा विविध समाजांचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. शासनाच्या योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी व्हॉट्सॅप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, तसेच अमृत महाराष्ट्र या माध्यमांचा वापर करून माहिती प्रसारित केली जात असल्याचे समाजातील प्रतिनिधींना सांगण्यात आले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ओपन कॅटेगरीतील अनेक समाजांना शासकीय योजनांचा अपेक्षित लाभ मिळत नव्हता. त्यामुळे जेव्हा त्यांना अमृत संस्थेच्या माध्यमातून शासन त्यांच्या विकासासाठी योजना राबवत असल्याची माहिती मिळाली, तेव्हा सुरुवातीला त्यांचा विश्वास बसत नव्हता. 'आमच्यासाठीही शासनाने योजना तयार केल्या आहेत का,' असा प्रश्न अनेकांनी विचारला. माहिती मिळाल्यानंतर मात्र त्यांनी आपले उद्योग, शेती व व्यवसायामध्ये या योजनांचा कसा उपयोग करून घेता येईल याबाबत उत्सुकता दाखवली.

समाजातील अनेक कुटुंबांनी मुलांच्या शिक्षणासाठी अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली. विशेषतः स्पर्धा परीक्षा, एमबीए, सीए, मेडिकल क्षेत्र, शेतीविषयक प्रशिक्षण व उद्योग मार्गदर्शन यामध्ये दर्जेदार प्रशिक्षण व अभ्यास साहित्य मिळावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. काही जणांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत, कर्जप्रक्रिया व मार्गदर्शनाची अपेक्षादेखील व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग असल्यामुळे 'शेतीपूरक काय देता येईल?' हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. यासाठी शेतकरी बचत गट तयार करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे, हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट ठरू शकते. तसेच प्रत्येक तालुक्यात फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून प्रक्रिया उद्योग, शेतीमाल साठवणूक, खरेदी-विक्री, आयात-निर्यात व्यवसाय यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.

अशा कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. पुढे सर्व तालुक्यातील फार्मर प्रोड्युसर कंपन्या एकत्र आल्यास त्यांचे फेडरेशन तयार होऊ शकते. त्यामुळे शासकीय अनुदान, प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध होण्यास अधिक मदत मिळू शकते. यासाठी शासनाकडून व तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय, गोपालन, पंचगव्य उत्पादने आणि शेतीपूरक लघुउद्योग याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता दिसून आली. या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्यास लक्ष्यित गटातील अनेक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येऊ शकते. विशेषतः ब्राह्मण समाजाबाबत असे दिसून आले, की मागील काही वर्षांमध्ये उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधींसाठी शहरांकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. अनेक गावांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणावर असलेली कुटुंबे आता फक्त दोन-तीन घरांपुरती मर्यादित राहिली आहेत. त्यामुळे गावांमध्ये समाज टिकून राहण्यासाठी शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर देणे आवश्यक आहे.

अमृत संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना केवळ योजनांची माहिती देणे नव्हे, तर त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणे, शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणे हे मोठे ध्येय साध्य होऊ शकते. शासन, समाज आणि युवक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना समाजाच्या अपेक्षा, गरजा आणि विकासाच्या संधी यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास केवळ योजनांचा प्रचार नसून, समाज परिवर्तनाची नवी दिशा ठरू शकतो.

संजय गोसावी

नाशिक जिल्हा व्यवस्थापक, अमृत


Publisher: Sanjay Gosavi News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 03:00 PM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Sanjay Gosavi News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 03:00 PM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement