अमृत परिवार सर्वेक्षणातून अमरावतीतील खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित गटाचे वास्तव आले समोर
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यातील काही नोंदी...
अमृत परिवार सर्वेक्षणाच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये फिरताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तिवसा तालुका, प्रत्येक गाव आणि प्रत्येक व्यक्तीने एक वेगळाच अनुभव दिला. कुठे संघर्ष होता, कुठे आशा होती... तर कुठे बदल घडवून आणण्याची तीव्र इच्छा दिसत होती. ग्रामीण भागातील साधी, प्रामाणिक आणि आत्मीयतेने भरलेली माणसे भेटली.
अनेकांनी अमृत संस्थेपुढे आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या, तर अनेकांनी विकासाच्या नव्या संधींबद्दल उत्सुकता दाखवली. आपल्या आयुष्यात अमृत संस्थेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडू शकतो ही जाणीव शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येकाच्या डोळ्यांत स्पष्ट जाणवत होती.
काही ठिकाणी लोकांनी प्रेमाने स्वागत केले, तर काही ठिकाणी त्यांच्या संघर्षमय जीवनाने मन सुन्न केले; मात्र एक गोष्ट सर्वत्र समान दिसली - परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा आणि जिद्द अजूनही जिवंत आहे. अनेक व्यक्तींशी संवाद साधताना जाणवले, की योग्य मार्गदर्शन, अमृत संस्थेच्या योजनांची माहिती आणि संधी मिळाल्यास सामान्य माणूसही असामान्य प्रगती करू शकतो, यावर लोकांचा विश्वास बसला.
या सर्वेक्षणातून केवळ माहितीच मिळाली नाही, तर समाजाच्या विविध स्तरांतील वास्तव, भावना आणि अपेक्षा जवळून अनुभवता आल्या. हा प्रवास माणुसकी, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारा ठरला. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक अनुभवाने हे अधोरेखित केले, की समाजपरिवर्तनाची खरी ताकद लोकांच्या विश्वासात आणि सहभागातच दडलेली आहे. लोकसहभाग आणि अमृत संस्थेची साथ समाजाची परिस्थिती बदलण्यास हातभार लावत आहे.
केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment