नाशिक जिल्ह्यातील काही नोंदी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील काही नोंदी...
अमृत परिवार सर्वेक्षणाचा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन आणि प्रेरणादायी होता. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी यांची माहिती समजली. सुरुवातीला काही लोक माहिती देण्यास संकोच करत होते; पण मी त्यांच्याशी नम्रपणे संवाद साधला आणि सर्वेक्षणाचा उद्देश समजावून सांगितला. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आणि त्यांनी सहकार्य केले.
सर्वेक्षण करताना मी कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे शिक्षण, व्यवसाय, उत्पन्न इत्यादींबद्दल माहिती घेतली. तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभाबद्दल माहिती सांगितली. अनेक महिलांनी आपल्या समस्या आणि अनुभव मनमोकळेपणाने सांगितले.
या सर्वेक्षणाद्वारे मला विविध कुटुंबांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कामामुळे माझा आत्मविश्वास वाढला. लोकांशी कसे बोलावे, माहिती कशी गोळा करावी आणि जबाबदारीने काम कसे करावे हे मला शिकायला मिळाले. परिवार सर्वेक्षणामुळे समाजातील वास्तव परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळाली.
- कीर्ती शेटे
अमृतसखी, नाशिक
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment